बीड, 15 सप्टेंबर – ऑनलाईन रिपोर्टर
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नद्यांनी व नाल्यांनी महापूराचे रूप धारण केल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने जनतेच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व खाजगी व सरकारी शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळा, महाविद्यालय यांना मंगळवार, म्हणजेच 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेचे पूर्ण दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे बीडसह मराठवाडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. शिरूर, पाटोदा, आष्टी, बीड, वडवणी, गेवराई, अंबाजोगाई व परळी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहेत.
जिल्हा प्रशासनाने तसेच स्थानिक पातळीवर मदतकार्याचे संचालन केले असून, प्रभावित भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे काम जोरात सुरू आहे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्कतेने कार्यरत असून, पुढील सूचना मिळत राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.










