
जालना (रिपोर्टर): मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून आज सकाळी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी देत तेथील शेतकर्यांच्या शेतात जावून नुकसानीची पाहणी केली. शासन शेतकर्यांच्या पाठीशी आहे, त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पंकजा मुंडेंनी म्हटले.
आज सकाळी त्यांनी जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात जांब समर्थ, कुंभार पिंपळगाव, चिंचोली येथील गावच्या शिवारातील शेतात जाऊन पाहणी केली. गोळेगाव, सुखापुरी, शहापूर या गावातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देत ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पुढे पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात डेरेदाखल झाल्या. धोंडराई गावाला अमृता नदीच्या पाण्याने वेढा घातला होता, तेथील शेती उद्ध्वस्त झाली आहे. गावातील घरांमध्ये पाणी घुसले होते, त्याची पाहणी पंकजा मुंडे पाहणी करत असून तेथील लोकांसोबत संवाद साधत आहेत. उपस्थित नागरिकांना, ‘सरकार तुमच्या पाठीशी आहे’, जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी या वेळी म्हटले.








