
घरात पाणी, दुकानात पाणी, बिंदुसरेला पूर
बीड (रिपोर्टर): मध्यरात्री बारा वाजल्यापासून धुवॉधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर बिंदुसरा नदीकाठच्या लोकांनी रात्र जागून काढली. दुसरीकडे अतिवृष्टी झाल्याने बिंदुसरा नदी दुथडी वाहत असून शहरातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात, व्यवसायिकांच्या दुकानात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर लोकांचे नुकसान झाले आहे.

शहरातल्या शिवाजी धांडे नगर, मुक्ता लॉन्सच्या पाठीमागील बाजूचा सर्व परिसर जलमय झाल्याचे दिसून येत असून गुडघ्यापेक्षा वर जिथे तिथे पाणी साचले आहे. घरात आणि दुकानांमध्ये पाणी गेल्याचे सांगण्यात येते. शिवाजीनगर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे इथेही तीच परिस्थिती आहे. इकडे खासबाग, लेंडी रोड, बिंदुसरा नदी काठच्या गावांमध्येही अशीच भयावह परिस्थिती आहे. शासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
नदीकाठच्या लोकांना शासनाकडून तातडीची मदत
अन्न-धान्याच्या किट वाटप
बीड शहरातील बिंदुसरा नदीपात्राच्या काठेवर राहणार्या आणि ज्या भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. ज्या ठिकाणातून स्थलांतर करावे लागत आहे अशा ठिकाणच्या नागरिकांना बीड जिल्हा प्रशासनाने तातडीची मदत देणे सुरू केले आहे. यामध्ये दहा किलो तांदुळ, दहा किलो गहू दिला जात आहे.








