बीड : ऑनलाईन रिपोर्टर
गेल्या ११ वर्षांपासून श्री क्षेत्र भगवानगडावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. मराठवाड्यातील हा मेळावा आता एक राजकीय परंपरा बनला आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा जसा राज्यात गाजतो, तसाच भगवानगडावरील मेळाव्याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले जाते. यंदाच्या मेळाव्यात पंकजा मुंडेंनी आपल्या समर्थकांना भावनिक भाषण केले, तर भाऊ धनंजय मुंडेंनीही आपल्या मनातील भावना उघड करत शायरीतून आणि थेट प्रहार करत आपली बाजू मांडली.
पंकजा मुंडेंचा दमदार संदेश – जातीय राक्षस संपवायचे आहेत
आपल्या भाषणात पंकजा मुंडेंनी दिवंगत वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागवत कार्यकर्त्यांना भावनिक केले. “मी वडिलांसोबत भगवानगडावर मेळाव्यासाठी येत होते, त्या आठवणी आज ताज्या झाल्या,” असे सांगत त्यांनी जातीपातीच्या राजकारणावर थेट प्रहार केला.
त्यांनी स्पष्टपणे म्हटले – “आज जातीवाद, धर्मवाद यांचे राक्षस आपल्या विचारांमध्ये जन्म घेत आहेत. आपण नवरात्रात दुर्गेची पूजा केली, तिने महिषासुर–रक्तबिजासारख्या राक्षसांचा नाश केला. तशीच शक्ती आम्हालाही मिळावी, जातीय राक्षसांचा नाश करण्याची गरज आहे.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, जातींना एकत्र बांधण्याचे काम आपल्याकडून व्हावे, हीच माझी इच्छा आहे.
भगवानबाबांचे स्मारक आणि सावरगावाचा अभिमान
पंकजा मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा गौरव करताना सांगितले की, “भगवानबाबांचे भव्य स्मारक हे सरकारी पैशातून नव्हे, तर ऊसतोड कामगारांच्या घामातून उभे राहिले आहे. कुणाची टक्केवारी, कुणाचा पैसा न घेता हे मंदिर उभारले गेले आहे. कार्यकर्त्यांच्या श्रमाचे फळ म्हणजेच हे स्मारक.”
यावेळी त्यांनी शायरीतून समाजातील वास्तव मांडले –
“जब देखती हूँ भुके बच्चे, फटे हुए कपडों में माँ, गरीबी में तड़पता परिवार, मैं खून के आँसू रोती हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ…”
या शायरीने उपस्थित कार्यकर्त्यांना भावनिक केले.
सरकारकडे केलेल्या मागण्यांना यश
भगवानगड ट्रस्टच्या मागणीनुसार, खरवंडी येथील वनविभागाची चार हेक्टर जागा भक्तांच्या सेवासुविधा, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्याबद्दल पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचे ट्विट करून आभार मानले आणि “भगवानबाबांप्रती आणि मुंडे साहेबांप्रती तुमचं प्रेम पाहून मी सद्गदित झाले,” असेही त्यांनी नमूद केले.










