बीड जिल्ह्यावर महिलाराज
बीड (रिपोर्टर): राज्यातील आगामी स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोमवार रोजी 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. या सोडतीत बहुचर्चीत असलेली बीड नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची जागा ही एस.सी. महिलेसाठी सुटली. अनेक जण ही निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशींग बांधून तयार होते. मात्र आज कोजागिरीच्या चांदण्यात इच्छुकांच्या स्वप्नांवर अंधाराचे साम्राज्य पसरले. तिकडे परळी वैजिनाथ ही नगरपालिका अध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी, गेवराई- सर्वसाधारण महिला, धारूर-सर्वसाधारण पुरुष, अंबाजोगाई-ओबीसी महिला, माजलगाव – ओबीसी महिलासाठी सुटली असून दिवाळीनंतर लगेच स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा धुराडा उडणार आहे.
गेल्या दशकभराच्या आसपास स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा स्थितीत स्थानीक स्वराज्य संस्थेवर आपले आधिराज्य असावे यासाठी जुने-नवे पुढारी उद्याच्या निवडणुकीत मोठ्या ताकतीने उतरणार. यासाठी अनेकांनी तयारी दाखवली. बीड नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची बहुगर्दी ओपनमध्ये पहावयास मिळत होती. जो तो अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून लॉबिंग करताना दिसून येत होतं. कोणी पक्ष बदल होते, कोणी आपआपल्या पक्षाच्या मातब्बरांच्या बगलेत राहत होते. आपणच अध्यक्ष होणार, आपल्यालाच उमेदवारी मिळणार, या दृढ आत्मविश्वासात वावरत होते. अध्यीपदाचे दिव्य स्वप्न पाहणार्यांना आरक्षण सोडतीत कोजागिरीच्या पोर्णिमेला दिवसा चांदणं दिसलं आणि त्यांच्या स्वप्नांना काळोख्याने माखले. अशी काहींची स्थितीत बीडमधील इच्छुकांची पहावयास मिळत असून बीडची जागा ही एस.सी. महिलेसाठी सुटली आहे. सोशल मिडियावर ‘बाबासाहेबांची लेक अध्यक्ष होणार’ असे आत्मविश्वासी ब्रिद व्हायरल होत असून बीडसाठी ‘जय भीम’चा नारा सर्वत्र गुंजताना दिसून येत आहे. दुसरीकडे मुंडे बंधू-भगिनींच्या परळी नगरपालिकेची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी सुटली आहे. गेवराई सर्वसाधारण महिला, धारूर -सर्वसाधारण पुरुष, अंबाजोगाई – ओबीसी महिला, माजलगाव – ओबीसी महिला प्रवर्गासाठी सोडण्यात आली आहे. सोडत सुरू असून अन्य जागांच्या सोडती सुरू आहेत.









