
तिन्ही प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा
वाहतूक पोलीस फक्त पावत्या फाडण्यासाठी
बीड (रिपोर्टर): कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थापनाबाबत सातत्याने पोलिसांच्या दुर्लक्षित कामकाजामुळे त्यांच्यावर आरोप होतात. आज सकाळी बार्शीनाका परिसरात तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाल्याने तीनही प्रमुख रस्त्यांवर वाहनाचंया लांबच्या लांब रांगा लागल्याचे दिसून येते. वाहतूक पोलीस त्यांना दिलेल्या पॉईंटवर कधीही हजर नसतात. केवळ पावत्या फाडण्यासाठी एखादा कोपरा पाहून उभे राहतात, असा आरोप करत आज सकाळी अनेक जणांनी केवळ पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे बार्शीनाका परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे म्हटले.

आज सकाळी साडेनऊ ते अकराच्या सुमारास बार्शीनाका या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. बार्शीनाका परिसरात परळीकडून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. त्याचबरोबर धुळे-सोलापूर महामार्गावरचा हा बीड शहरामधील पहिला प्रमुख चौक आहे. याठिकाणी पोलीस चौकी गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. पोलीस चौकीत पोलीस कधी दिसून येत नाहीत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या चौकात कधी पोलीस उभा राहिलेला क्वचित दिसतो. पावत्या फाडण्यासाठी लॉ कॉलेज आणि इकडे तेलगावनाका चौक या भागात मात्र पोलीस आढळून येतात. आज जेव्हा वाहतूक कोंडी झाली तेव्हा बीड शहराकडे पाली आणि परळीकडे जाणार्या तिन्ही रस्त्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळाल्या. या रस्त्यावरून प्रवास करणार्यांना तब्बल एक ते दीड तास या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे झाली? हे मात्र समजू शकले नाही. परंतु वाहतूक पोलीस जागेवर असते तर एवढावेळ वाहतूक कोंडी झाली नसती, असे उपस्थितांचे सांगणे होते.








