
वारकरी संप्रदायाचा शेतकरी आत्महत्या थांबविण्याचा करणार संकल्प
ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी मध्ये सहभागी व्हा – रामेश्वर महाराज धपाटे
बीड (रिपोर्टर): संतभूमी मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांना आळा घालण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने एक अनोखी सामाजिक चळवळ उभारली जात आहे. शेतकर्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि आत्महत्येचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी संपूर्ण मराठवाड्यात प्रबोधन करत आहे. उद्या बीड जिल्ह्यात दिंडी येणार आहे. या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री ह भ प रामेश्वर महाराज धपाटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
बीड जिल्ह्यात या दिंडी मधून शेतकरी समस्यांबाबत करण्यात जनजागृती येणार आहे. शेतकर्यांना आत्मविश्वास, आशा आणि श्रद्धेचा नवा आधार देण्यासाठी हजारो वारकर्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार आहे. वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी) आणि सचिव डॉ. सदानंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी संतभुमी मराठवाड्यात भ्रमंती करत आहे. शेतकर्याच्या आत्महत्येच्या बातम्या थांबल्या पाहिजेत; वारकरी संप्रदाय ही सामाजिक जबाबदारी मानून पुढे येत आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. या ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी चा 11 ऑक्टोबर रोजी बीड येथे आगमन होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भव्य स्वागत व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन, प्रवचन, अभंग व भजनी मंडळांच्या माध्यमातून शेतकर्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.








