
मुंबई, (रिपोर्टर)ः- देशातील कोट्यवधी शेतकर्यांच्या नजरा सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याकडे लागल्या आहेत. ही योजना शेतकर्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार ठरली असून, याअंतर्गत पात्र शेतकर्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही मदत शेतीसाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीसाठी तसेच घरखर्चासाठी मोठा दिलासा ठरते.
केंद्र सरकारने आतापर्यंत 20 हप्ते शेतकर्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा केले आहेत. मागील 20 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी थेट 9.7 कोटी शेतकर्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. आता 21 व्या हप्त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, 21 वा हप्ता दिवाळीपूर्वीच शेतकर्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असतो, त्यामुळे सरकारकडूनही शेतकर्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वीच आर्थिक गिफ्ट मिळू शकते, अशी अपेक्षा देशभरातील शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र, केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
पूरग्रस्त शेतकर्यांना आधीच मदत: महाराष्ट्र, जम्मू-कश्मीर आणि पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने अशा पूरग्रस्त शेतकर्यांना मदतीसाठी प्राधान्य दिले आणि त्यांना 21 वा हप्ता आगाऊ वितरित केला आहे.








