
सभास्थळासह शहरात कडेकोट बंदोबस्त
ना. छगन भुजबळ काय बोलणार, उभ्या महाराष्ट्राचे लक्ष
ना. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य ओबीसी नेतेही उपस्थित राहणार

बीड (रिपोर्टर): विचार उद्याचा, ओबीसीच्या भविष्याचा, तुमच्या-आमच्या अस्तित्वाचा, असं म्हणत आज अखंड ओबीसींची महाएल्गार सभा बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होत असून त्या अनुषंगाने बीड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सभास्थळी पोलिसांची संख्या लक्षणीय पहावयास मिळत असून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सभेला सुरुवात होणार आहे. या सभेसाठी राज्याचे अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार असून यासह पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह ओबीसी समाजाचे अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यातून छगन भुजबळ काय बोलणार ? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात गेल्या पंधरवाड्यातच बीडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. अतिवृष्टीमुळे ही सभा रद्द करण्यात आली. ती आता घेण्यात येत आहे. बीड शहरात शेकडो बॅनर लावण्यात आले असून या बॅनरवर ‘विचार उद्याचा, ओबीसीच्या भविष्याचा, तुमच्या-आमच्या अस्तित्वाचा’ ‘ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी चलो बीड’ असे लिहिण्यात आले असून या सभेसाठी छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, पंकज भुजबळ, नवनाथ वाघमारे यासह अन्य ओबीसी नेत्यांचे फोटो बॅनरवर पहावयास मिळत आहेत. सभेची जय्यत तयारी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर करण्यात आली आहे.कडेकोट पोलीस बंदोबस्त शहरामध्ये पहावयास मिळत असून अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ या सभेतून काय भाष्य करणार? याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.








