
अनुदान लांबच राहिले साधा पंचनामा करण्यासाठी कोणी येईना ; कोठारबनचे वयोवृद्ध शेतकरी हतबल…
वडवणी (रिपोर्टर):- शेतातून आणलेला कांदा शेतातच एकत्रित करून तो शेडमध्ये ठेवला होता. परंतु मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे पत्रांमधून पाणी आल्याने व शेतातील पाणी शेडमधून गेल्याने सदरील 35 टन कांदा नासला असून नुकसान भरपाई लांबच राहिली. त्याचा साधा पंचनामा देखील करण्यासाठी कोणताच अधिकारी घटनास्थळी येईना. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. कोठारबनचे वयोध्द शेतकरी या प्रशासनापुढे हातबल झाला झाला असून सदरील शेतकर्याने थेट बीडच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन गऱ्हाणे मांडले आहे.
कोठारबन येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध शेतकरी तुळशीराम जनार्दन घुले यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दि. 17 ऑक्टोबर वार शुक्रवार रोजी लेखी निवेदन दिले आहे या निवेदनात असे म्हटले आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबियांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. दि.4 जून 2025 रोजी माझा मुलगा चंद्रकांत तुळशीराम घुले (वय वर्ष 35) याचा जांभळीच्या झाडावरून पडून दि. 5 जून 2025 रोजी निधन झाले आहे. हे दुःखद घटना आमच्या कुटुंबीयांच्या जिव्हारी लागलेली असताना माझ्या नावावर मौजे कोठारबन शिवारात गट नं.442 या ठिकाणी शेतातील पत्राच्या शेडमध्ये 35 टन एकत्रित साठवलेला कांदा मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी वरील पावसामुळे व शेड खालून आणि कांद्या खालून पाणी गेल्याने सदरील कांदा हा संपूर्ण नासला असून वाया गेला आहे. यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सदरील नुकसानी बाबत वयोवृद्ध शेतकरी तुळशीराम घुले यांनी वडवणी तहसीलदार व तालुका कृषी कार्यालय वडवणी यांच्याकडे वारंवार तोंडी याबाबत पंचनामा करण्याची विनंती केली. परंतु सदरील अधिकारी हे ,आमचे काम नाही असे म्हणून उडवा उडवी चे उत्तर देत असून आज तगायत रोजी सदरील नुकसानीचा पंचनामा केलेला नाही किंवा संबंधित अधिकार्याने आदेश देखील दिले नाहीत. तर बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेबांनी याबाबत योग्य तो पाठपुरावा करून संबंधित अधिकार्यांना पंचनामे करण्याचे आदेश देऊन सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई देण्यात यावी ही विनंती. पंचनामा करून आर्थिक मदत मिळावी. अन्यथा माझ्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय उरलेला नाही. या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
** हतबल झालो आहे -शेतकरी **
घरातील तरुणकाट्या पोराचं अकाली निधन यात असे नुकसान कुटुंबाचा गाडा, शेतीवरच अवलंबून असल्याने असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासन कोणतीच माहिती द्यायला तयार नाही. पंचनामा करत नाही. आमच्या अधिपत्याखाली येत नाही असे सांगून उडवा उडवीचे उत्तर देत आहेत. यामुळे मी जिल्हाधिकार्यांना माझे घराणे मांडले आहे. यांच्याकडून हा प्रश्न सुटला नाही तर मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे दाद मागणार आहे. या प्रकरणामुळे मी हातबल झालो आहे. अशी प्रतिक्रिया सदरील वयोवृद्ध शेतकरी तुळशीराम जनार्दन घुले यांनी साज दै. बीड रिपोर्टर अशी बोलताना दिली आहे.








