
दिवाळीच्या तोंडावरही मजुरांच्या खात्यावर पैसे पडले नाही
बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत आनंदाचा शिधा वाटप केला होता. यंदा मात्र राज्य सरकारला या शिध्याची आठवण आली नाही. शिधा नाही तर नाही रोहयोवरील मजुरांचे पैसेही आजपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झाले नव्हते. निदान दिवाळीला तरी शासनाने मजुरांच्या खात्यावर पैसे टाकायला पाहिजे होते. दोन दिवसात पैसे खात्यावर नाही पडल्यास मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोहयोची कामे केली जात असतात. प्रत्येक तालुकास्तरावर ही रोहयोची कामे होत असतात. वैयक्तिक सिंचन विहिरी, घरकुल, शेततलाव, फळबाग यासह आदी कामे केली जात आहे. मजुरांना पंधरा दिवसाला पैसे द्यायला हवे पण केंद्र सरकार तीन -तीन महिने मजुरांच्या खात्यावर पैसे जमा करत नाही त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येते. दिवाळी दोन दिवसांवर आली, या सणाच्या निमित्ताने यंदा सरकारने आनंदाचा शिधा तर वाटप केला नाही त्याचबरोबर केेंद्राने मजुरांच्या खात्यावर पैसेही टाकले नाही. बीड जिल्ह्यातील मजुरांचे 31 कोटी 18 लाख रुपये थकलेले आहेत. जी परिस्थिती बीड जिल्ह्याची आहे तीच परिस्थिती इतर जिल्ह्यांची असल्याचे दिसून येत आहे.








