
वडवणी , (रिपोर्टर)ः- डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून एक प्रकारे त्यांचा खून झाला आहे.या पाठीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याने मृत्यूनंतर तरी मयतास न्याय मिळणे अपेक्षित आहे.त्यामुळे या संशयित खून प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यातील न्यायालयांतर्गत चालवावा,अशी ठाम मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केली आहे.
डॉ.संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने बाबुराव पोरभरे आक्रमक झाले आहेत.या आत्महत्येस प्रवर्त करणार्या प्रवृत्तीला ते कठोरात कठोर शासन देण्यासाठी अग्रेसर आहेत.सतत ते मयत डॉ.संपदा मुंडे यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात असून त्यांना धीर देत त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही देत आहेत.
पोटभरे यांनी म्हटलं की,हा खटला बीडच्या जनतेशी,विशेषतःमहिला सुरक्षिततेशी आणि न्यायप्रणालीवरील विश्वासाशी थेट निगडित आहे.त्यामुळे न्यायालय बीड जिल्ह्यातच राहिल्यास साक्षीदारांना सहज उपस्थित राहता येईल आणि जनतेलाही पारदर्शकपणे न्यायनिवाडा पाहता येईल.त्यांनी पुढे सांगितले की,या प्रकरणाला अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न केल्यास जनतेत रोष निर्माण होऊ शकतो. न्याय मिळावा,परंतु तो लोकांच्या डोळ्यासमोर मिळावा.त्यासाठी एसआयटी चौकशी होऊन जलद न्यायालयात हा खटला चालवण्याची त्यांनी मागणी केली आहे.दरम्यान सदरील मागणी पोटभरे यांच्याकडे मयत संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.








