
एसआयटी स्थापनेवर डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांनी मत व्यक्त केले
वडवणी (रिपोर्टर):- फलटण येथे झालेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या नंतर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. आज सकाळी डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांतील शिक्षक चुलते धनराज मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या दुःख व भावनांची दखल घेतली, चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद परंतु या समितीमध्ये अधिकारी व सदस्यांची नेमणूक करताना डॉ. मुंडे यांच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन नेमणूक करावी तरच हा तपास पारदर्शक होईल अशी भावना व्यक्त केली आहे.
कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात एसआयटी स्थापनेचे निर्देश दिले आहेत. यावर साजं दैनिक बीड रिपोर्टरने कुटुंबीयांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. यावेळी डॉ. संपदा मुंडे यांचे चुलते शिक्षक धनराज मुंडे सर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. ते म्हणाले की, एसआयटीची नेमणूक केली आहे, आमच्या दुःखाची व भावनांची कदर केली आहे, चांगली गोष्ट आहे, मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानत पुढे म्हणाले की, या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये महिला अधिकार्यांची तसेच इतर सदस्यांची नियुक्ती करावी. हि नियुक्ती करताना डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घ्यावे, तरच या प्रकरणाचा तपास पारदर्शक होईल. तसेच यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि दुसर्या डॉ. संपदा मुंडे घडल्या नाही पाहिजे. अशी भावना व्यक्त करत न्यायाची प्रतीक्षा करत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.







