महायुतीतले पक्ष आमने-सामने; महाविकास आघाडी गपगुमान
बहुप्रतिक्षेनंतर निवडणुका, बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची घोषणा नाही
बीड (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून समजल्या जाणार्या बीड जिल्ह्यात सहा नगरपालिकांसाठी निवडणूक होत असून उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. बहुप्रतिक्षेनंतर नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. मात्र राज्यात गेल्या तीन वर्षांच्या कालखंडात घडलेल्या अनपेक्षित घडामोडीमुळे सत्तेतले पक्ष स्थानिक निवडणुकीत एकमेकांसमोर येत असल्याने गेवराई वगळता अद्याप अन्य पाचही नगरपालिकांसाठी भाजप, अजितदादा राष्ट्रवादी, शरद पवार राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्ही गट आणि काँग्रेसला उमेदवारांची घोषणा करता आलेली नाही. अद्यापही चाचपणी आणि मनधरणी करण्यात सर्वच पक्ष गुंतले असल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात भाजपाचा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचा वरचष्मा असला तरी या दोन्ही पक्षांना अद्याप उमेदवारांची घोषणा करता आली नसल्याने आठवडाभरात अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी केवळ सहा दिवस प्रचारासाठी मिळणार असल्याने उमेदवारांची या निवडणुकीत दमछाक होणार आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेगट हे तिघेही स्वतंत्र लढण्याच्या तयारीमध्ये पहावयास मिळत आहे तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्ह्यात नेतृत्व करणार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून म्हणजे 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे, असे असताना अद्याप भाजपासह अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व करू पाहणार्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार घोषीत करता आलेले नाहीत. गेवराई वगळता अन्य पाचही नगरपालिकांसाठी कोणाकडूनच उमेदवारांची घोषणा झालेली नाही.
बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांपैकी बीड नगरपालिकेचे अध्यीपद एस.सी. महिला प्रवर्गासाठी आरक्षीत आहे. गेवराई ओपन महिला, माजलगाव ओबीसी महिला, परळी सर्वसाधारण, धारूर सर्वसाधारण आणि अंबाजोगाई न.प. अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे. स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपआपल्या उमेदवारांची अद्याप चाचपणीच करत आहे.
गेवराईत भाजप, अजितदादा राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा
गेवराईमध्ये महायुतीतील भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादी न.प.साठी आमने-सामने उभी राहिली असून जिल्ह्यात सर्वप्रथम याठिकाणी उमेदवारांची घोषणा झाली आहे. अजितदादा गटाकडून माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी शितल महेश दाभाडे यांची अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली त्यापाठोपाठ भाजपाकडून बाळराजे पवार यांच्या सौभाग्यवती गीता बाळराजे पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अद्याप महाविकास आघाडीकडून याठिकाणी कुठल्याच हालचाली पहावयास मिळत नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करत पवारांसोबत संधान साधले आहे. त्यामुळे इथे पंडित विरुद्ध पवार ही चूरस पहायलाि मळणार आहे.
परळी-अंबाजोगाई-धारूर या तिन्ही सर्वसाधारण जागेसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
परळी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार हा मुंडे भाऊ-बहिणीचा असणार आहे. जिल्ह्यात केवळ महायुतीमध्ये परळीतच निवडणूक लढविली जाणार हे आता स्पष्ट होत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही, तसा मुंडे भाऊ-बहिणीकडूनही उमेदवाराची घोषणा अद्याप झालेली नाही. धारूरमध्येही कुठल्याही उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. तिकडे बहुचर्चीत अंबाजोगाई नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची जागा ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटली आहे. या ठिकाणी तालुक्याचा कारभार हा 35 वर्षांपासून मुंदडा कुटुंबीय हाकत आला आहे. तर शहराचा कारभार पापा मोदी गेल्या 25 वर्षांपासून हाकताना दिसून येतात. आता भाजपाच्या मुंदडा कुटुंबियांकडून नंदकिशोर मुंदडा हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते तर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून पापा मोदी हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. अद्याप या ठिकाणी उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महाविकास आघाडीकडूनही उमेदवार देण्यात आलेला नाही.
माजलगाव नगरपालिकेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी सोडण्यात आलेले आहे. या ठिकाणी महायुतीत एकमत होण्याची तुसभर शक्यता दिसून येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गट विरुद्ध भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात या ठिकाणी लढत होईल. परंतु अद्याप इथेही उमेदवारांची घोषणा झालेली नाही.
प्रचारासाठी अवघे सहा दिवस
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. 25 नोव्हेंबरपर्यंत न्यायप्रविष्ट आणि क्लिष्ट उमेदवारी अर्ज वापस घेतले जातील. 2 डिसेंबरला मतदान आहे. त्यामुळे केवळ उमेदवारांसाठी प्रचारासाठी सहा दिवस उरणार आहेत.









