बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले. उशीरा पर्यंत पाऊस पडत राहिल्याने 1 नोव्हेंबरच्या पुढे सहकारी साखर कारखाने सुरू झाले. कारखाने सुरू झाल्यापासून ते आज पर्यंत सहा सहकारी व दोन खाजगी अशा आठ कारखान्यांनी आतापर्यंत 8 लाख 67 हजार 36 टन उसाचे गाळप केले. मध्यंतरी ऊसाच्या भावासाठी माजलगाव तालुक्यातील तीन कारखाने बंद होते. त्यामुळे गाळपावर त्याचा परिणाम झाला होता. मात्र तडजोडी अंती कारखाने पुन्हा सुरू झाले.
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा आणि दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र मागील काही वर्षापासून जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढू लागले. मागील तीन वर्षे सतत चांगला पाऊस पडत गेला. धरणात मुबलक पाण्याचा साठा जमा झाल्याने शेतकरी ऊस लागवडी कडे वळले. त्यातच गोदावरी नदी गेवराई तालुक्यातून जात असल्याने गेवराई तालुक्यात ऊसाचे क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यात या वर्षी आठ कारखान्यांनी गाळप सुरू केले. त्यातील सहा सहकारी व दोन खाजगी कारखाने आहेत. या कारखान्यांनी आतापर्यंत 8 लाख 67 हजार 336 टन उसाचे गाळप करत 5 लाख 17 हजार 555 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान या वर्षी उशीरा साखर कारखाने सुरू झाले. उशीरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने 1 नोव्हेंबर नंतर जिल्ह्यासह राज्यातील सहकारी साखरकारखाने सुरू झाले आहेत. यंदा उशीरापर्यंत कारखाने सुरू राहण्याची शक्यता आहे.
उसतोडीसाठी हार्वेस्टरचा वापर
राज्यात हार्वेस्टरची संख्या वाढली
ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर वापरण्यात येत आहे. मागील पाच वर्षापुर्वी हे हार्वेस्टर दुर्मीळ मानले जात होते. आता या हार्वेस्टरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक व्यवसायीकांनी आणि कारखानदारांनी हार्वेस्टर खरेदी केले. हार्वेस्टर खरेदीसाठी सरकार अनुदान देत आहे. त्यामुळे दरवर्षी हार्वेस्टर वाढतअसल्याचे दिसून येत आहे. काही तासामध्ये एक दोन एक्कर हार्वेस्टरने तोडून निघत आहे.












