शिरूर कासार ):- शेतकर्यांच्या शेतीमालाला योग्य व हमीभाव मिळावा, यासाठी उभाटा शिवसेनेच्या वतीने शिरूर कासार येथील जिजामाता चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर व तालुका प्रमुख सोपान मोरे यांनी केले.यावेळी शेतकरी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
सध्याच्या काळात शेतकर्यांचे उत्पादन खर्च वाढले असून, मात्र बाजारात त्यांच्या शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी हमीभाव खरेदी केंद्रे तात्काळ उभारावीत, तसेच तूर, मका, उडीद, मूग, सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांची शासकीय दराने व योग्य भावाने खरेदी करावी, अशी ठाम मागणी केली. बाजार समित्या व व्यापार्यांकडून होणारी लूट थांबवावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आंदोलनादरम्यान शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व शेतकर्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत, शेतकर्यांच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरल्याचे उपजिल्हा प्रमुख अजिनाथ खेडकर यांनी सांगितले. तालुका प्रमुख सोपान मोरे यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल. त्यामुळे सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात हमीभावाची अंमलबजावणी करावी. या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले.











