गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील गोदाकाठी असलेल्या शेतकर्यांनी रब्बी पिकाला पाणी देण्यासाठी ठिकठिकाणी मोटारी बसवल्या आहेत. या मोटारी आणि त्याचे वायर चोरण्याचे प्रकार गोदाकाठी वाढले. काल आगरनांदूर, नागझरी, गोंदी या परिसरातील शंभर ते दीडशे मोटारींचे वायर अज्ञात चोरट्यांनी चोरले. वायर काढून त्याच ठिकाणी जाळून त्यातील कॉपर लंपास केले. गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मोटारी चोरणारी टोळी जेरबंद केली होती. सदरील गोदा परिसरामध्ये चोरट्यांच्या या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
गेवराई तालुक्यातील गोदाकाठावरील गोंदी, आगरनांदूर, नागझरी यासह अन्य गावच्या शेतकर्यांनी नदीवर मोटारी बसवलेल्या आहेत. रात्रीच्या दरम्यान गोदाकाठी कोणी नसल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी शंभर ते दीडशे शेतकर्यांच्या मोटारीचे केबल वायर काढून हे वायर घटनास्थळी जाळून त्याचे कॉपर चोरून नेले आहे. यापूर्वीही विद्युतपंप चोरीचे प्रकार परिसरामध्ये घडलेले होते. चोरट्यांनी वायरची चोरी केल्याने गोदाकाठ परिसरात एकच खळबळ उडाली. एका मोटारीच्या वायरची किंमत जवळपास आठ ते दहा हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच लाखो रुपयांच्या वायरची चोरी चोरट्यांनी केली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काही दिवसांपूर्वीच बीड पोलिसांनी मोटारी चोरणारी एक टोळी पकडली होती. गोदाकाठ परिसरात वायर आणि मोटारी चोरणारी टोळी सक्रिय असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.











