आष्टी (रिपोर्टर): आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव येथील शेळके वस्तीवर 4 जानेवारीच्या मध्यरात्री झालेल्या थरारक जबरी चोरीच्या घटनेचा अंभोरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 150 किलोमीटरची सखोल शोधमोहीम राबवत चोरीत सहभागी असलेल्या दोन सख्ख्या भावांना त्यांच्या घरातून अटक केली आहे.
अक्षय गारमन चव्हाण (वय 23) आणि रिजवान गारमन चव्हाण (वय 20, रा. शेरी बुद्रुक, ता. आष्टी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरवाजा तोडून मारहाण, दागिने व रोकड लंपास4 जानेवारीच्या मध्यरात्री सराटेवडगाव येथील ग्यानबा राजपुरे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सदस्यांना मारहाण करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने लंपास केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी तातडीने तपासचक्र फिरवले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग काढला
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील तसेच 150 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यासोबतच तांत्रिक विश्लेषण, हालचालींचा अभ्यास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासात चोरटे आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील असल्याची खात्री पोलिसांना पटली.
भल्या पहाटे घराला वेढा, झोपेतच अटक
मंगळवारी पहाटे अंभोरा पोलिसांच्या पथकाने शेरी बुद्रुक येथे आरोपींच्या घराला वेढा घातला. आरोपी गाढ झोपेत असतानाच पोलिसांनी त्यांच्या घरात प्रवेश करत दोघांनाही अटक केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
चोरट्यांची नवी ‘मोडस ऑपरेंडी’ उघड
तपासादरम्यान आरोपींची एक धक्कादायक पद्धत समोर आली आहे. चोरीसाठी जाताना हे आरोपी स्वतःचे मोबाईल फोन दुसर्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात ठेवत असत, जेणेकरून त्यांचे लोकेशन पोलिसांना सापडू नये. गुन्ह्यासाठी ते वेगळी सिमकार्डे आणि मोबाईल वापरत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अंभोरा पोलिसांनी या ‘हुशारीला’ मात दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्यासह 17 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत ही कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, या जबरी चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या इतर फरार आरोपींचा शोध अंभोरा पोलीस घेत असून, लवकरच आणखी अटका होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.











