स्वीकृत सदस्यपदी विजय मोटे व आबासाहेब काकडे यांची निवड
——
गेवराई (रिपोर्टर) गेवराई नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी सौ. रेवती भगवान घुंबार्डे यांची निवड करण्यात आली आहे. तर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी विजय कैलास मोटे व आबासाहेब अंकुश काकडे यांची निवड करण्यात आली. ही निवड नगरपरिषदेच्या विशेष सभेत एकमताने करण्यात आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.
नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा सौ.गीताभाभी बाळराजे पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी सौ. रेवती घुंबार्डे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला उपस्थित नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला. सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि जनतेशी असलेली थेट नाळ लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी विजय (मुन्ना) कैलास मोटे व आबासाहेब अंकुश काकडे यांची निवड करण्यात आली. दोन्ही नवनियुक्त सदस्यांचा सामाजिक कार्याचा अनुभव, प्रशासकीय कामकाजातील अभ्यास व शहर विकासाबाबतची सकारात्मक भूमिका लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष सौ. रेवती घुंबार्डे तसेच स्वीकृत सदस्य विजय मोटे व आबासाहेब काकडे यांचा नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी गेवराई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडीबद्दल नगरपरिषदेतील पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिकांकडून नवनिर्वाचितांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून आगामी काळात नगरपरिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












