परीक्षार्थी उन्हात, केंद्रसंचालक कोमात
बीड (रिपोर्टर): राज्यभरात16 लाख 15 हजार 489 विद्यार्थी इयत्ता दहावीची परीक्षा देत आहेत तर बीड जिल्ह्यात 43 हजार 68 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी जिल्हाधिकारी एकीकडे प्रयत्नशील असताना दुसरीकडे शिक्षण विभागाचा गलथान काभार पुन्हा पुन्हा चव्हाट्यावर येत असल्याचे दिसून येते. बीड तालुक्यातल्या कुर्ला या गावी यशवंत विद्यालयाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वर्गात न बसवता थेट त्यांची आसनव्यवस्था भरउन्हात साधा मंडप टाकून केली. परीक्षा भरण्यापूर्वीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर शिक्षण विभागाने तेथील केंद्र संचालकावर निलंबमनाची कारवाई केली मात्र विद्यार्थ्यांना आजचा पहिला पेपर हा बाहेर उन्हात मंडपाखाली द्यावा लागला. यामुळे पालकात संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यात 156 परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावीची परीक्षा होत आहे. जवळपास सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे शिक्षण विभाग आणि महसूल विभागामार्फत निगराणी करण्यात येत आहे. ज्या वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही नाही, अशा ठिकाणी मोबाईल झूम अॅपद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. आज दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. त्यामुळे महसूल विभागासह शिक्षण विभागाचीही या परीक्षेवर करडी नजर आहे. बीड जिल्ह्यात 156 परीक्षा केंद्रांपैकी 6 परीक्षा केंद्रे हे संवेदनशील परीक्षा केंद्र आहेत. त्याठिकाणी महसूल विभागाच्या पथकाने ठान मांडलेले आहे. ड्रोन कॅमेर्याद्वारेही या परीक्षा निगराणीखाली आहेत. बीड शहरातील राजस्थानी विद्यालयासह इतर परीक्षा केंद्रांवर आज ड्रोनद्वारे निरीक्षण करण्यात आले. बीडपासून जवळच असलेल्या यशवंत विद्यालयात शाळेची इमारत असताना सुद्धा व विद्यार्थी संख्या कमी असतानाही केंद्र संचालकांनी वर्गखोल्यात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना न बसवता इमारतीसमोरर मंडप टाकून या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसविले. ही बाब लोकांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने शिक्षण विभागाच्या पथकाने याठिकाणी भेट दिली आणि आपला अहवाल शिक्षण विभागाला सादर केला. त्यानंतर शिक्षण विभागाने येथील केंद्र संचालकाचा निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाला पाठवला आहे









