मुंबई/बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट अर्बन बँकांकडून ठेवीदारांच्या हजारो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याने बीडसह नजीकच्या जिल्ह्यातील ठेवीदारांनी आज आझाद मैदानावर जोरदार आंदोलन छेडले. ठेवीदार संघर्ष कृती समिती तथा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचीन उबाळे यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर हजारो ठेवीदारांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू असून हातात फलक आणि बॅनर घेऊन ठेवीदारांनी संबंधित मल्टीस्टेट बँकांसह सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आपले पैसे तात्काळ परत करावेत, ठेवीदारांना तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी केली.

बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी, जिजाऊ माँ साहेब, शुभकल्याण, छत्रपती या सर्व मल्टीस्टेट सोसायट्या व मराठवाडा अर्बन, माजलगाव अर्बन, लक्ष्मीमाता अर्बन या संस्थांमध्ये बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य ठेवीदारांचे तब्बल 15 ते 20 हजार कोटी रुपये अडकलेले आहेत. संबंधित मल्टीस्टेट अर्बनच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल आहेत. मात्र सर्वसामान्यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. या पैश्यासाठी ठेवीदार गेल्या चार वर्षांपासून आंदोलने करत आहेत. शासन दरबारी विनंत्या करत आहेत. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आज बीड जिल्ह्यातील ठेवीदारांनी थेट मुंबईच्या आझाद मैदानावर कूच करत आंदोलन सुरू केले.

आंदोलनकर्त्यांनी शासन आणि तपास यंत्रणांकडे अनेक ठोस मागण्या मांडल्या. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्तांचा तात्काळ लिलाव करून ठेवीदारांना पैसे परत द्यावेत, संचालक व त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करावी, तीसगाव डेअरी व फलटण डेअरी जप्त करावी, ज्ञानराधा मल्टीस्टेटचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करावे, तसेच ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाची तारीख जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

तसेच प्रलंबित असलेले एमपीआयडी प्रस्ताव तात्काळ मंजूर करून ठेवीदारांना न्याय द्यावा, तसेच सर्व प्रलंबित एमपीआयडी प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत, ठेवीदारांच्या वतीने सहकार क्षेत्रातील नामांकित सरकारी वकील नेमावा, जप्त मालमत्तांचा तात्काळ लिलाव करून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, तसेच छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी व संचालक मंडळाला तात्काळ अटक करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या वेळी आंदोलनाला आ. संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली.









