बीड | ऑनलाईन रिपोर्टर
भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ (RAV), दिल्ली यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘गुरू-शिष्य परंपरा’ (CRAV) या उपक्रमांतर्गत बीडचे आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य शिवप्रसाद चरखा यांची ‘राष्ट्रीय आयुर्वेद गुरू’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमासाठी संपूर्ण देशातून केवळ ९९ आयुर्वेद तज्ज्ञांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये वैद्य चरखा यांचा समावेश झाला आहे. ही निवड अत्यंत कडक निकषांच्या आधारे करण्यात येते. वैद्यकीय अनुभव, पारंपरिक आयुर्वेद ज्ञान, रुग्णसेवा, संशोधन आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची क्षमता या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय स्तरावर तज्ज्ञांची निवड केली जाते.
‘गुरू-शिष्य परंपरा’ ही प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती जपण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या गुरूंना ठरावीक कालावधीसाठी शिष्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली जाते. आयुर्वेद शास्त्रातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक उपचार पद्धती, निदान तंत्र, औषधनिर्मिती आणि रुग्ण व्यवस्थापन यांचे मार्गदर्शन केले जाते.
वैद्य शिवप्रसाद चरखा यांनी दीर्घकाळ आयुर्वेद क्षेत्रात कार्य करत अनेक रुग्णांना उपचार दिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता देशभरातील निवडक विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्याचा गौरव वाढला असून, आयुर्वेद क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.









