पुणे | गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे वारकऱ्यांना आषाढी वारीला जाता आलं नाही. बसमधून संतांच्या पालख्या पंढरपुरला नेण्यात येत होत्या. विठूरायाच्या दर्शनाची आस लावून बसलेल्या वारकऱ्यांना यंदा पंढरीची वारी घडणार आहे. अखंड वारकरी सांप्रदाय ज्या आषाढी वारीची आस लावून आहे त्या वारीची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आदी संतांच्या पालख्या यावेळेस हजारो वारकऱ्यांसह पंढरीस जाणार आहेत. दोन वर्षांपासून वारी बंद असल्याने लाखो वैष्णवांची मांदियाळी पंढरीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यावर्षांत अंदाजे 15 लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दोन वर्ष वारीला जाता आलं नाही. वारीच्या आनंद सोहळ्यास मुकावं लागलं होतं. संतांच्या आगमनाने निर्माण होणाऱ्या चैतन्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वारी संदर्भात एक बैठक घेतली होती. वारकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून तयारी करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पालखी मार्ग, देवस्थानच्या तिथीचे वेळापत्रक, संस्थानची तयारी, रथ दुरूस्तीचे काम या कामांना वेग आलेला आहे. तंबूंचा डागडूजी, वाहनांच नियोजन तसेच दिंड्यांची तयारी सुरू आहे.
यंदाच्या विक्रमी गर्दी शक्यता पाहता प्रशासनाकडूनही नियोजन करण्यात येत आहे. दोन वर्षांचा कठिण काळ लोटल्यानंतर यावर्षी थाटामाटात आषाढी वारी करण्यासाठी वारकरी उत्सुक आहेत.