धारूर (जि. बीड) : ऑनलाईन रिपोर्टर
धारूर तालुक्यातील हिंगणी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला. तलावावर पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलींमधील तिघी मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या होडीवर बसल्या असता होडी अचानक पलटली. या दुर्घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेत पलक शामराव पारवे (वय १४, रा. हिंगणी) आणि दिव्या विकास कांबळे (रा. कासारवाडी, ता. परळी) यांचा मृत्यू झाला असून, मोहिनी पारवे हिने प्रसंगावधान राखत जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पलक पारवे, दिव्या कांबळे, मोहिनी पारवे, तन्वी पारवे आणि जानवी पारवे या पाच मुली गावालगतच्या तलावावर पोहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी तलावावर मासे पकडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या होडीवर पलक, दिव्या आणि मोहिनी या तिघी बसल्या. सुरुवातीला होडी तलावात व्यवस्थित जात होती. मात्र काही अंतर गेल्यानंतर अचानक होडीचा तोल गेला आणि होडी तलावाच्या मधोमध पलटली.
होडी पलटताच तिन्ही मुली पाण्यात बुडू लागल्या. मोहिनीला पोहता येत असल्याने ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र घाबरलेल्या पलक आणि दिव्या यांनी तिला घट्ट पकडल्याने तिघींचाही तोल सुटला आणि त्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. तलावाच्या काठावर असलेल्या तन्वी आणि जानवी यांनी हा प्रकार पाहताच मोठ्याने आरडाओरडा केला.
गावकऱ्यांनी घेतली धाव
मुलींच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारून तिघींना बाहेर काढले. त्यावेळी तिघीही बेशुद्ध अवस्थेत होत्या. काही वेळात मोहिनीला शुद्ध आली. मात्र पलक आणि दिव्या यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती.
ग्रामस्थांनी तातडीने दोघींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघींनाही मृत घोषित केले.
हिंगणी गावावर शोककळा
या दुर्दैवी घटनेमुळे हिंगणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अल्पवयीन मुलींच्या अकाली मृत्यूने गावातील वातावरण हळहळून गेले असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
दरम्यान, या घटनेनंतर तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.










