बीड (रिपोर्टर):- उसने दिलेले चार लाख ३० हजार रूपये परत मागितल्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेच्या डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केल्याची घटना काल परळी ग्रामिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारावती तांडा येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारावतीतांडा येथील निकीत संजय राठोड या महिलेने ४ लाख ३० हजार रूपये हात उसने आरोपीला दिले होते. ते पैसे परत मागितल्याचा राग आणून काल आरोपी घनराज काशीनाथ राठोड याने शिवीगाळ करून हातातील कोयत्याने फिर्यादी महिलेच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. व हनुमंत पवार, राहुल चव्हाण, काशीनाथ राठोड, अनुसया काशीनाथ राठोड, वनिता राठोड सर्व रा.धारावती तांडा यांनी लाथा बुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.ना.केकाण हे करत आहेत.