Friday, May 20, 2022
No menu items!
HomeUncategorizedप्रखर- खमक्या विरोधकाची गरज

प्रखर- खमक्या विरोधकाची गरज


लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधकांना काही जबाबदार्‍या दिल्या आहेत. त्यांनी आपल्या जबाबदार्‍याचं पालन न केल्यास लोकशाही धोक्यात येवू शकते. पाशवी बहुमत असणं हे मुळात हुकूमशाही वृत्तीचं लक्षण मानलं जातं. जास्तीचं बहुमत सत्ताधार्‍यास अहंकारी बनवतं. तो ‘सत्ताधारी’ इतरांना कचर्‍या समान मानतो. लोकांनी मला इतकं पाशवी बहुमत दिलं असं म्हणुन तो नको ते निर्णय घेवून चुकीचे निर्णय जनतेच्या खांद्यावर लादतो. लोकांचा विरोध झाला की, भावनीक मुद्दे समोर आणुन जनतेच्या हितासाठीच मी हे करतो अशी दिशाभूल केली जाते. भारतात आता पर्यंत अनेकांनी केंद्रात सत्ता भोगली. बहुतांश पंतप्रधानांनी चांगले काम केले. जे पंतप्रधान समाजहिताचे निर्णय घेवू शकले नाही. त्यांची इतिहासाने साधी नोंद ही घेतली नाही. चांगलं काम करणार्‍यांची स्तुती जनता नेहमीच करत असते. कॉंग्रेस पक्षाला जास्त काळ देशात सत्ता मिळाली. स्व. इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी यांच्या कार्यकाळात कॉंग्रेस पक्ष मोठया जोमात होता. इतर पक्ष मात्र कोमात होते, इंदिरा गांधी यांचे काही चुकीचे निर्णय देशातील लोकांना आवडले नाही. तेव्हा देशातील जनतेने कॉंग्रेसलाच नव्हे तर इंदिरा गांधी यांचा देखील पराभव करुन लोकांची ताकद काय असते हे दाखवून दिले होते. देशात नेहमीच परिर्वतन झालेलं आहे. कॉंग्रेस, भाजपा आणि समाजवादी, डावे या पक्षाचं चांगलं प्राबल्य राहिलेलं आहे. आणीबाणीच्या कार्यकाळात सत्तांतर होवून जनता पक्षाचं सरकार आलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा परिवर्तन होवून कॉंग्रेसने बाजी मारली होती. १९८० नंतर भाजपाचं वारं चांगलं वाहत राहिलं. अटलबिहारी वाजेपयी आणि लालकृष्ण आडवाणी यांचा हा तो कार्यकाळ होता. दोन जागा असलेल्या भाजपाला १९९९ साली पाच वर्ष सत्तेची संधी मिळाली. त्यानंतर दहा वर्ष युपीए सत्तेत होतं आणि युपीएचा पाडाव होवून नरेंद्र मोदींचा उदय झाला.


२०१४ ची निवडणुक
युपीएचा कार्यकाळ तसा मनमोहन सिंंग यांचा होता, ते दहा वर्ष पंतप्रधान होते. सोनिया गांधी ह्या हायकमांड होत्या. कॉंग्रेस पक्षाला सोनिया गांधी यांनीच तारलं होतं. मात्र सत्तेचा जास्तीचा कार्यकाळ मिळाला की, काहींना नको ते उद्योग आठवतात व सत्तेचा दुरुउपयोग करुन भ्रष्टवृत्ती वाढीस लागते. युपीएच्या कार्यकाळात अनेक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काहींना जेलमध्ये जावे लागले. काहींच्या भ्रष्टवृत्तीमुळे कॉग्रेस पक्ष बदनाम झाला. दोन-चार भ्रष्ट मंत्र्यामुळे संपुर्ण कॉंग्रेसचं भ्रष्ट आहे अशी अवाई विरेाधकांनी उठवली. त्यामुळे लोकात कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात विरोधी भुमिका निर्माण झाली. २०१३ साली भाजपाने मोदी यांना पुढे करुन पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषीत केल्यापासून मोदी यांनी मोठया घोषणा द्यायला आणि आश्‍वासनाचे फवारे उडवायला सुरुवात केली होती. आता मोदी देशाचा कायापालट करुन जगात देश समृध्द करतात की काय अशी भावना लोकामध्ये निर्माण झाली होती, देशात एक ही बेरोजगार दिसणार नाही? तरुण रिकामे फिरणार नाहीत. मजुरांच्या हाताला बारा महिने काम मिळेल? स्वामीनाथन आयोग आणण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे शेतकरी खुष होते. दहशतवाद संपणार असेही आश्‍वासन होते. सगळीकडे शांती ही शांती निर्माण होणार अशी आशा लोकांना होती. फक्त काही महिन्याचीच संधी द्या असे मोदी यांचे म्हणणे होते. २०१४ ते २०१९ चा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला तरी देशात काही आशेचा किरण दिसला नाही. त्याच-त्या बाता आणि खोटे आश्‍वासन होते त्याची पुर्तता काही झाली नाही. २०१९ ची देखील निवडणुक भाजपाने अगदी दणक्यात जिंकली. मोदी यांची सत्ता येवून सहा वर्ष झाली. या सहा वर्षात काहीच बदल झाला नाही. उलट समस्या वाढल्या. ज्या वेळी पंतप्रधान मोंदींना प्रश्‍न विचारले जावू लागले तेव्हा मात्र कहरच होवू लागला. प्रश्‍न विचारणारे देशद्रोही ठरवले जावू लागले, हे दिवस पाहण्यासाठीच भाजपाला सत्ता दिली की काय असा प्रश्‍न लोकांना पडू लागला.


निपचीत प्रादेशीक पक्ष
अवघ्या देशात म्हणजे शंभर टक्के भाजपाचे राज्य आणायचे आहे, अशी मनिषा भाजपावाल्यांची आहे. त्यामुळे भाजपावाले प्रत्येक राज्य आपलं झालं पाहिजे याचा विचार करुन त्या -त्या राज्यातील सत्तास्थाने मोडून आपलं सरकार स्थापन करत आहे. ज्या राज्यातील प्रादेशीक पक्ष आपल्याला वरचढ होत आहे. त्या राज्यात वेगवेगळे प्रयोग करुन प्रादेशीक पक्षांना त्रास दिला जावू लागला. लोकशाही मार्गाने सत्तांतर झाले नाही तर हुकूमशाही मार्गाने करण्याची मोहीमच भाजपावाल्यांंनी सुरु केली. बिहारमध्ये आपलं स्थान बळकट केल्यानंतर पश्‍चिम बंगाल मध्ये भाजपाने जोर लावला. ममता बॅनर्जी ह्या भाजपाला दाद देत नाहीत. त्यामुळे बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपात राग निर्माण झाला आणि त्यांची सत्ता उलथून लावण्याची मोहिम भाजपाने हाती घेतली. एकीकडे कोरोनामुळे संसद बंद ठेवायची आणि दुसरीकडे मात्र गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे बंगालमध्ये हजारोंच्या संख्येने रॅली काढत होते. रॅलीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला नाही का? बंगालमध्ये फोडाफोडीला प्रचंड वेग आला आहे. कर्नाटकमध्ये भाजपाने कॉंग्रेस आणि देवेगोैडा यांची सत्ता उलथून लावली. मध्यप्रदेशमध्ये ही तीच शाळा खेळली गेली. राजस्थान मध्ये हालचाली सुरु आहेत. प्रादेशीक पक्षांना उखडून फेकायचं ही नीती सुरु झाली. त्यामुळे प्रादेशीक पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले. एक काळ असा होता की, देशात प्रादेशीक पक्षांची चलती होती, आज ती स्थिती राहली नाही. काही ठिकाणी प्रादेशीक पक्षांना सोबत घेवून भाजपा वाढला, नंतर त्याच प्रादेशीक पक्षांना मागे सारुन भाजपाने आपलं वर्चस्व निर्माण केलं. येणार्‍या काळात प्रादेशीक पक्षांची अवस्था घर के ना घाट के अशीच झाली तर नवल वाटू नये.


इतका अतिपणा चांगला नसतो
सत्ताधार्‍यांनी सत्तेच्या धुंदीत कधीच राहू नये. जेव्हा सत्तेची धुंदी चढते तेव्हा त्याच्या पनीपताची सुरुवात व्हायला लागते. आंदोलन कोणाचे का असेना त्याची दखल घेतली पाहिजे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आपण आणलेल्या कायद्याच्या विरोधात कुणी आंदोलन करत असेल तर आपण कुठं चुकतोत का याचं आत्मपरिक्षण सत्ताधारी का करत नाही? आत्मपरिक्षण करणं हा अपमान थोडाच आहे. भाजपाच्या डोक्यात इतकी सत्तेची हवा शिरली, की इतरांना ते भाव देण्याचा विचार करत नाही. शेतकरी आंदोलनाची चर्चा अवघ्या देशातच नव्हे परदेशात होत आहे. पन्नास दिवसापेक्षा जास्त दिवस झाले शेतकरी दिल्लीच्या सिमेवर बसले आहेत. ह्या शेतकर्‍या प्रति कसलाही कळवळा भाजपावाल्यांना आलेला नाही. आता पर्यत ज्या काही चर्चा झाल्या त्या वांझ ठरल्या. कोर्टाने कायद्याला स्थगिती आणून यावर एक समिती नेमली आहे. मात्र समितीमधील सदस्य हे कृषी बिलाचे समर्थक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांचा आहे. त्यामुळे ते आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. आंदोलनातील आता पर्यंत पन्नास पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. इतके मोठे शेतकरी मरण पावले त्याची साधी चर्चा होत नाही. मीडीयामध्ये तसे काही दाखवले जात नाही किंवा छापले जात नाही. शेतकर्‍यांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आला. त्याची चर्चाच होवू द्यायची नाही, अशी व्युहरचना आखण्यात आली. हे सगळं काही सत्तेच्या मदमस्तीत होत आहे.


विरोधक आक्रमण नाहीत
लोकशाहीत विरोधकांची भुमिका महत्वाची असते. लोकशाहीत विरोधक नसेल तर ती लोकशाही नसते. ज्या राज्यात प्रादेशीक पक्ष मजबुत आहेत. त्या राज्यातील प्रादेशीक पक्षाचे नेते मजबुत आहेत, मात्र आक्रमक नाहीत. ते आपली भुमिका काही स्पष्ट करत नाहीत. आपण आणि आपलं राज्य भलं याच भुमिकेत ते असतात. त्यांना विरोधी असलेल्या भाजपा बद्दल भुमिका घ्यावी असं वाटत नाही. उत्तरप्रदेश मधील मुलायमसिंह यादव,अखिलेश यादव, मायावती यांनी अनेक वर्ष सत्तास्थान मिळवलेले आहे.त्यांचा राजकारणात चांगला अनुभव आहे. त्यांची या राज्यात चांगली पकड राहिलेली आहे. मात्र या तिन्ही नेत्यांची भुमिका पाहता त्यांच्यात केंद्राच्या विरोधात विरोधी बाना दिसत नाही. उत्तर प्रदेश हे सगळ्यात मोठं राज्य आहे. या राज्यात नेहमीच काही ना काही घटना घडतात तरी देखील येथील विरोधी नेते गप्प असतात.त्यांच्या गप्प राहिण्याचे कारण समजू शकले नाही. बिहारचे नितीश कुमार भाजपाच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांचा विरोधात बोलण्याचा संबंध येत नाही. महाराष्ट्रात शिवसेना चांगली विरोधी भुमिका निभावत आहे. सगळ्यात जास्त टोकाचा विरोध शिवसेनेचा आहे. शिवसेना सत्तेत सोबत असतांना चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही. आज ही शिवसेना विरोधी बाकावर आक्रमकच आहे. राष्ट्रवादी विरोधी भुमिका चांगली निभावत आहे. मात्र राष्ट्रवादीचं लोकसभेतील संख्याबळ कमी पडतं. पवार हे राजकारणात मोठं नाव आहे. त्यांना राजकारणाचा दांडगा अभ्यास आहे. देशातील इतर छोटे मोठे पक्ष काही आवाज उठवत नाहीत. कॉंग्रेस पक्ष खरा विरोधी बाकावर असला तरी राज्या-राज्यातील कॉंग्रेसची ताकद कमी पडू लागली. कॉंग्रेसचंं संघटन कमी झालं. कॉंग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं नाही ही कॉंग्रेसची नामुष्की आहे. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी एकटेच विरोधी भुमिका निभावत असले तरी त्यांना देशातील कॉग्रंेस नेत्यांची साथ मिळत नाही. कॉग्रंेस अजुनही मरगळलेलाच आहे. कॉंग्रेस पक्षात जीव आलेला नाही. पक्षात जीव आणण्याचे काम झाले नाही तर पक्षाचं भवितव्य अवघड आहे. देशातील जे-जे विरोधी बकावरील नेते आहेत, ते विरोधकांची भुमिका योग्य पध्दतीने निभावत नाही. त्यांना सत्ताधार्‍याकडून कारवाईची भीती वाटतेय की काय असं वाटू लागलं. कारण अलीकडच्या काळात सीबीआय, ईडीचे छापे आणि नोटीसा कुणालाही येवू लागल्या. विरोधक असं गप्प बसून राहिले तर देशाच्या सत्तेत हुकूमशाही वृत्तीचं स्थान बळकट होईल आणि हुकूमशाहीला हटवणं अवघड जाईल. विरोधकांचा आवाज शांत राहिला तर लोकशाहीला कुणीही वाचवू शकणार नाही. लोकशाही प्रगल्भ करायची असेल तर विरोधक जागा असला पाहिजे, नुसता जागा राहून फायदा नाही त्याने सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्‍न विचारले पाहिजे. चुकीच्या कामाबाबत रस्त्यावर उतरले पाहिजे. आज देशात विरोधक आहेत की नाही असं वाटतं? सगळीकडे सन्नाटा वाटतो. विरोधकांच्या गोटातील सन्नाटा देशासाठी आणि लोकशाहीसाठी धोकादायक आहे. देशाला खमक्या विरोधकाची गरज असून देश विरोधकाच्या शोधात आहे.

Most Popular

error: Content is protected !!