बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांना काल प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबीत केले आहे.
भगवान सोनवणे हे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी पदी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात कार्यरत आहेत. ते अपंग असल्यामुळे त्यांची बीड जिल्हा परिषदेमधून कुठेही बदली होत नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील खाचखळगे आणि शिक्षकांची कामे व्यवहार सांभाळून कसे करायचे? याचे गणित सोनवणे यांना चांगले अवगत आहे. प्राथमिक विभागातील शिक्षक समायोजनामध्ये मोठ्या प्रमाणात सोनवणे यांनी अनियमितता केली आहे. त्याचा ठपका ठेवत काल अख्ख्या शिक्षण विभागाची सुनावणी घेत सोनवणे यांना दोषी ठरवत पवार यांनी सोनवणे यांना अखेर निलंबीत केले आहे.
बहिर यांच्याकडे पदभार
जाण्याची शक्यता
बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात शालेय पोषण आहार विभागाचे अधिक्षक म्हणून कार्यरत असलेले अजय बहिर यांना बर्याचदा प्राथमिक विभागाचा शिक्षणाधिकारी पदाचा पदभार भेटलेला आहे. कधी कामातील गती, तर कधी राजकीय संबंध याचा फायदा त्यांना अनेकदा होतो. माजलगाव या ठिकाणी त्यांचा पदभार असला तरी बीड येथेच ते कायमस्वरुपी असतात. प्राथमिक विभागात अनेक विभागांच्या फाईली प्रलंबीत असल्याने कामातील गती वाढावी, या हेतुने मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी बहिर यांच्याकडे प्राथमिक विभागाचा पदभार देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा दोन दिवसांपासून शिक्षण विभागात जोराने चालू आहे.