अतिरिक्त उसाला हेक्टरी अडीच लाख द्या -थावरे
माजलगाव/बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मेनंतरही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. शासनाने ज्या शेतकर्याचा ऊस अतिरिक्त राहिला आहे त्या शेतकर्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज गंगाभीषण थावरे यांनी आनंद गाव येथील उसाच्या फडात साखर आयुक्ताची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती. या वेळी अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती.
ऊस जात नाही म्हणून गेवराई तालुक्यातील जाधव नामक शेतकर्याने उसाचा फड पेटवून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराला सर्वस्वी साखर आयुक्त कार्यालय जबाबदार असून या प्रकरणी साखर आयुक्त कार्यालयाच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ज्या शेतकर्यांचा ऊस अजूनही फडात उभा आहे त्या शेतकर्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे भाई गंगाभीषण थावरे यांनी उसाच्या फडात साखर आयुक्त कार्यालयाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध केला. या वेळी अनेक शेतकर्यांची उपस्थिती होती. दरम्यान, आनंदगाव येथील बालासाहेब गायके या शेतकर्याचा ऊस जयमहेश कारखान्याने उतरून घेतला नसल्याने या प्रकरणी कारखान्याविरोधात कारवाई करण्याची मागणी थावरे यांनी केली आहे.