पोलिसात अद्याप तक्रार नाही, पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू
अंबाजोगाई (रिपोर्टर) शहरातील वडारवाडा भागात दोन भावात झालेल्या भांडणातून एका भावाच्या डोक्याला काठीने मार लागल्याने तो गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यू पावल्याची घटना रात्री उशीरा अंबाजोगाई शहरात घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून गेल्या दहा दिवसांपूर्वी याच भागात खुनाची घटना घडली होती. या प्रकरणी अद्याप पोलिसात कुठलीही तक्रार दाखल झालेली नसून सदरचा प्रकार हा नेमका कशातून घडला ? याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत अधिक असे की, अंबाजोगाई शहरातील वडारवाडा भागातील जावेद सिकंदर शेख हा तरुण सुरुवातीला ऑटो रिक्क्षा चालवायचा मात्र गेल्या काही दिवसांपासून तो एका खासगी दुकानात काम करत आहे. रात्री तो कामावरून घरी परत आला. त्यावेळी जावेद आणि त्याच्या मोठ्या भावाचे वाद सुरू झाले. शाब्दीक वादाचे रुपांतर बाचाबाची, धरपकड आणि भांडणात झाले. या वेळी जावेद याच्या डोक्याला काठीचा मार लागल्याने तो जखमी होत मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना जावेदचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरचे भांडण हे जेवणाच्या कारणावरून झाल्याचे प्रथमदर्शनी सांण्यात येते. जावेदच्या पार्थीवदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी अद्याप पोलिसात कुठलीही तक्रार दाखल नाही. मात्र डॉक्टरांनी एमएलसीची नोंद केली आहे. सख्ख्या भावांमध्ये वाद होऊन एकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात पोलीस नेमका हा वाद कशामुळे झाला याचा शोध गेत आहेत.











