बीड (रिपोर्टर) बीड शहराजवळ असलेल्या पांगरबावडी परिसरामध्ये बेवारस मृतदेह असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलीस घटनास्थळाकडे गेले असता मृतदेह ताब्यात घेत असतानाच घटनास्थळापासून काही अंतरावर अन्य एका तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना झाली. ते तात्काळ त्या घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी लग्नाचा घाट घालत असलेल्या तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून संबंधित तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आणि या प्ररणात तरुणाला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत अधिक असे की, काल दुपारी बीड ग्रामीण पोलिसांना पांगरबावडी जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह असल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा पोलीस त्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोहचले. मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळ पंचनामा करत असताना याच परिसरातील एका विहिरीत एका तरुणीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना झाली तेव्हा उपस्थित पोलीस तात्काळ त्या घटनास्थळाकडे गेले तेव्हा तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आलं. गेवराई तालुक्यातील वंजारवाडी येथील सुमित्रा राजू विटकर (वय 23) ही तरुणी सध्या बीडमधील गांधीनगर भागात राहते. ती एका खासगी हॉस्पिटलमध्ये (पान 7 वर)
नर्स म्हणून काम करायची. शहरातील शाहूनगर भागात राहणारा किशोर कचरू साठे हा त्या मुलीला लग्नाचा घाट घालायचा, लग्न केले नाहीस तर पळवून नेईल, अशी धमकी द्यायचा. काल दुपारी या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सुमित्रा हिने पांगरबावडी परिसरामध्ये एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयताच्या बहिणीने फिर्याद दिल्यानंतर आरोपी किशोर साठे याच्या विरोधात कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्य दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते.