बीड (रिपोर्टर) फोनवर बोलत असलेल्या नागरिकांचा मोबाईल हिसकावून दुचाकीवरून पळ काढणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून विविध कंपनीचे 26 मोबाईल जप्त केले आहे. ही कारवाई रात्री दहा वाजता रामतीर्थ नाका बीड येथे करण्यात आली.
धूमस्टाईलने येऊन फोनवर बोलणार्या नागरिकांचा मोबाईल हिसकावून पळणारी टोळी बीडमध्ये सक्रीय होती. त्यांनी अनेकांचे मोबाईल हिसकावल्याच्या घटना बीडमध्ये घडल्या. मात्र शिवाजीनगर पोलिसांनी आतापर्यंत फक्त दोघांच्याच तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत. अनेक जण शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी येतात मात्र लाईट नाही, साहेब नाहीत, असे म्हणून त्यांना वापस पाठवले जाते. दि. 26 नोव्हेंबर 2022 व दि. 4 डिसेंबर 2022 रोजी आरोपीने दुचाकीवर येऊन दोन मोबाईल हिसकावल्याच्या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. यातील आरोपी जयदत्त नवनाथ पाटोळे (वय 26) व ईश्वर बबन भांडवळकर व अन्य एक अल्पवयीन हे तिघे नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतीश वाघ यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक तयार करून आरोपींच्या शोधासाठी पाठविले. रात्री रामतीर्थ नाका बीड येथून दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी वरील मोबाईल चोरल्याचे तपासात सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपनीचे 26 मोबाईल जप्त केले त्याची अंदाजे किंमत 4 लाख 17 हजार आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन वाडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगतसिंग दुल्लत, मुन्ना वाघ, रामदास तांदळे, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, अशोक कदम यांनी केली.










