देशात सध्या भाजपाची चलती आहे. उत्तरभागातील राज्यामुळे भाजपाला केंद्रात यश मिळालेलं आहे. दक्षिणेत मात्र भाजपाच्या पदरी अजुनही निराशाच आहे. तेथील प्रादेशीक पक्ष तगडे आहेत. त्यांनी भाजपाला आपल्या राज्यात इंट्री करु दिली नाही. भाजपा दक्षिण भागात जाण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नाला अजुन तरी यश आलेलं नाही. केंद्रीय पातळीवर भाजपानंतर काँग्रेस पक्ष तगडा मानला जातो. काँग्रेसची अवस्था पाहता. हा पक्ष किती दिवस टिकेल या बाबत चर्चा होत असतात. काँग्रेसचं अवसान इतकं गळालं की, त्यातून काँग्रेसला सावरण्यासाठी किती वर्ष लागू शकतात हे सांगता येत नाही. देशात प्रादेशीक अनेक पक्ष असून सुध्दा ते केंद्रीय पातळीवरचं राजकारण करण्यापेक्षा आपल्या राज्यात राहणे पसंद करतात. आज पर्यंत अनेक प्रादेशीक पक्ष काँग्रेस व भाजपाच्या बाजुने राहिलेलेे आहेत. वाजपेयी पंतप्रधान असतांना त्यांना अनेक प्रादेशीक पक्षांची मदत मिळाली होती. काँग्रेसने मनमोहनसिंग पंतप्रधान असतांना प्रादेशीक पक्षांना सोबत घेवूनच सत्ता मिळवली होती. आज भाजपाला प्रादेशीक पक्षांची तितकी गरज नाही. त्यामुळे प्रादेशीक पक्षांना भाजपा तितका भाव देत नाही. शिवसेना पक्षाला भाजपाने फोडून या पक्षाची सत्ता उलटून टाकली. नितीश कुमार देखील भाजपापासून वेगळे झाले. असे इतर काही पक्षाच्या बाबतीत घडलेलं आहे. भाजपासाठी निवडणुका ह्या सर्वकाही असतं. कोणत्या ही निवडणुका जाहीर झाल्या की, भाजपा त्यात जीव ओतून काम करत असतो. स्थानिक निवडणुकीत भाजपाचे बडे नेते प्रचारासाठी येत असतात. भाजपा हाच एकमेव पक्ष राहिला पाहिजे. इतर पक्षांना स्थान नसावे अशीच भुमिका भाजपाची पुर्वीपासून राहिलेली आहे. विरोधकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, पण या प्रयत्नाला प्रत्येक वेळी यश येईल असं नाही. कधी ना कधी भाजपाला अपयशाला सामोरे जावे लागणारच आहे.
भाजपाने एक राज्य जिंकलं !
गुजरात, हिमाचल या दोन राज्याच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही राज्यात भाजपाने प्रचंड जोर लावला होता. विकास केला होता तर इतका जोर लावण्याची भाजपाला का गजर पडली? महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकल्प निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये पळवण्यात आले. प्रकल्प गुजरातमध्ये जात असतांना शिंदे, फडणवीस यांनी मौन धारण केलं. पाच वर्ष काही करायचं नाही. निवडणुका आल्या की, सावरा, सावरी करुन जनतेबद्दल कळवळा दाखवला जात असतो. गुजरात हे भाजपाच्या ताब्यात येणारचं होतं. त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष कमी पडला. काँग्रेसने आपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडली असती तर इतकी मानहाणी या पक्षाला पाहावी लागली नसती. काँगे्रसने गत निवडणुकीत चांगल्या जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत कॉग्रेस फक्त 17 जागावरच आली. राज्यातील काँग्रेस नेतृत्व सक्षम नसल्यामुळे इतका मोठा पराभव झाला. राहूल गांधी यात्रेत असल्यामुळे त्यांना प्रचार करायला वेळ मिळाला नाही. आम आदमीने उमेदवार उभे केल्यामुळे त्याचा बराच फटका काँग्रेसला बसला. भाजपाने आपल्या होमपिचवर जाती, धर्माचा आधार घेतला. दंगलीचा भुतकाळ भाजपावाल्यांनी उकरुन काढून मते मागितली. एकीकडे विकासाची टिमकी वाजवायची व दुसरीकडे जात,धर्मावर राजकीय भाकरी शेकायच्या हा भाजपाचा अजेंडाच झाला.
आपची मजल
आम आदमी पार्टी चांगलीच चर्चेत आली. आपने गुजरात निवडणुकीत चांगलचं लक्ष घातलं होतं. गुजरात जिंकून दाखवू असं आपच्या वतीने सांगण्यात येत होतं, पण तसं काही झालं नाही. आपला पाच जागा मिळाल्या. पाच जागा आपसाठी महत्वाच्या आहेत. पहिल्याच निवडणुकीत आपला चांगलं यश मिळालं. 12 टक्के मते आपने राज्यात मिळवले ही पक्षाच्या मानाने सकारात्मक बाब आहे. काँग्रेसचे मतदान घटले आणि आपची लोकप्रियता वाढली. आपने पंजाब जिंकल्यानंतर प्रत्येक राज्यात निवडणुकीची रणनिती ठरवायला सुरुवात केली. त्यांची रणनिती काही प्रमाणात काही होईन यशस्वी होऊ लागली. दिल्लीत महापालिका निवडणुकीत आपने विजय मिळवला. ही महापालिका भाजपाच्या ताब्यात होती. पंधरा वषार्ची भाजपाची सत्ता आपने उलथून टाकली. पुर्वी तीन महापालिका होत्या. भाजपाने सत्तेचा गैरवापर करत तीन पालिका एकत्रीत केल्या होत्या. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी काय, काय नाही भाजपाने केले. केजरीवाल यांच्या टीमवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले, पण भाजपाला ते आरोप सिध्द करता आले नाही. आपचे दिल्लीत काम चांगलेच आहे. शिक्षण,आरोग्य व इतर सुविधा आम आदमी पार्टीने लोकांना दिल्या. त्यामुळे तेथील लोकांनी आम आदमी पार्टीला निवडून दिलं. काँग्रेस दिल्लीत गिणतीत नाही. एकेकाळी दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. आज दिल्लीत काँग्रेस शुन्यावर आहे. शिला दिक्षीत नंतर दिल्लीत काँग्रेसला सक्षम नेतृत्व मिळाले नाही. दिल्लीतून देशाचं राजकारण हाकणार्या काँग्रेसला दिल्लीत पक्ष वाढवला आला नाही. जी अवस्था कॉग्रेसची दिल्लीत झाली. तशीच अवस्था भाजपाची झाली. भाजपाने दिल्लीची महापालिका जिंकण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केलेले होते. त्यांचे सर्व प्रयत्न दिल्लीकरांनी धुळीस मिळवून केजरीवाल यांच्या हाती संपुर्ण दिल्लीचा कारभार देण्यात आला. भाजपाच्या ताब्यातून दिल्लीची महापालिका जाणं हे भाजपाची मोठी मानहाणीच आहे. देश जिंकणारे दिल्लीत दाणून पराभूत झाले.
काँग्रेस जिवंत आहे !
दोन राज्यातील निवडणुकीत काय होईल अशीच चर्चा होत होती. दोन्ही राज्यात भाजपाचं वर्चस्व असेल असा काहींचा अंदाज होता, पण हिमाचल मध्ये कॉग्रंेसने लाज राखली. तेथील स्थानिक नेतृत्व चांगलं असल्यामुळे काँग्रेसला यश मिळालं. कॉग्रेस पक्षाने सत्ता काबीज केली. त्या ठिकाणी भाजपाची सत्ता होती. भाजपाने पुन्हा हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी गुजरातसारखेच प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही. हे राज्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे आहे. नड्डा महाराष्ट्रात येवून इतर पक्षांना उखडून टाकण्याची भाषा करत असतात. देशात फक्त भाजपाचं राहिलं इतर पक्ष दिसणार नाही असं ही मध्यंतरी नड्डा म्हणाले होते. नड्डा यांनाच आपल्या राज्यातून जनतेने उखडून फेकले आहे. सत्ता कधीच कायमची नसेत. सत्तेचा अमरपट्टा लावून कुणी आलं नाही. भाजपा वाल्यांना सत्तेचा इतका दर्प चढलेला असतो, ते सत्तेसाठी काय करतील याचा नेम नसतो. निकालादिवशी हिमालचमध्ये कॉग्रेसच्या जागा जास्त निवडून येत असतांना त्या ठिकाणी काही फोडा फोडी करता येते का याची चाचपणी देखील भाजपाच्या वतीने करण्यात येत होती,क पण भाजपाला 25 आणि काँग्रेसला 40 जागा मिळाल्या, त्यामुळे भाजपा गार झाला. काँग्रेस काटावर पास झाली असती तर नक्कीच हिमाचलमध्ये फोडाफोडी करुन भाजपाने हे राज्य अनाधिकृतपणे बळकावले असते. हिमाचल मिळाल्यामुळे काँग्रेसचा चेहरा जरा फुलला नाही तर काँग्रेसची आणखी मानहाणी झाली असती. या राज्यात प्रियंका गांधी यांनी विशेष लक्ष दिलं होतं. इतर ही काही नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. हिमाचलमुळे काँग्रेसला भविष्यात यश मिळू शकतं अशी आशा काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागली. म्हणायला तर झालं काँग्रेसकडे एखादं राज्य आहे, नाही तर काँग्रेस आज पुर्णंता रिकामं झालेलं घर आहे. काँग्रेस जिवंत आहे हे हिमाचलच्या यशमुळे दिसून येवू लागलं. हिमाचलमध्ये पराभव झाला असता तर याचं सर्वस्व खापर राहूल गांधी यांच्यावर फोडण्यात आलं असतं, पण हिमाचलने काँग्रेसची लाज राखली आहे.
विरोधक म्हणुन आप?
सत्ताधार्यास वेसन घाण्यासाठी खमक्या विरोधक असणं गरजेचं आहे. भाजपाने सगळे विरोधक गारद केले. काँग्रेस हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असतांना काँग्रेसचे बेहाल झालेे. काँग्रेसच्या आजच्या परस्थितीला काँग्रेसचे नेतेच तितके जबाबदार आहेत. काँग्रेसमध्ये सुस्तपणा जडला. पक्षवाढीचं काम केलं गेलं नाही. त्यामुळे काँग्रेसला आज हे दिवस पाहावे लागले. विशेष करुन काँग्रेसचं राजकारण आज प्रस्थापीता भोवतीच फिरत आहे. जो पर्यंत काँग्रेस इतरांना राजकारणात संधी देत नाही तो पर्यंत काँग्रेसला चांगले दिवस येतील असं वाटत नाही. काँग्रसेची ही अवस्था पाहून लोक इतर पक्षांचा शोध घेवू लागले. दहा, पाच वर्षानी नवं नेतृत्व उदयाला येत असतं. 2024 च्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तेला दहा वर्ष पुर्ण होतील. भाजपाची दहा वर्षाची सत्ता लोकांनी पाहितली. मोदी काही तरी वेगळं करुन दाखवतील असं सगळ्यांना वाटलं होतं, पण लोकांचे अंदाज सगळे पाण्यात गेले, लोक पुन्हा आता बदल हवा आहे असं म्हणू लागले. आम आदमी पार्टी भाजपाला टक्कर देवू लागली. काँग्रेस पेक्षा लोकांचा आपवर विश्वास वाढू लागलं. आम बाबत काँग्रेसचे काही का मत असेना पण काँग्रेसला मागे टाकण्याचं काम आप करु शकते. जिथं आपचं काहीच नाही तिथं आप दिसू लागली. येणार्या लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्ष आता पासून तयारी करु लागले. ही निवडणुक भाजपा, काँग्रेससाठी अतिमहत्वाची आहे. भाजपाला विजयाची हॅट्रीक करायची आहे तर काँग्रेसला पुन्हा सत्तेचं स्थान मिळवायचं आहे. काँग्रेसने जी काही भारत जोडो यात्रा काढली. ती यात्रा पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगानेच काढली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण व्हावे, लोकांनी पुन्हा काँग्रेसला आपलं मानावं हा दृष्टीकोन समोरच ठेवूनच काँग्रेसची यात्रा सुरु आहे. यात्रा काँग्रेसला किती यश मिळवून देते हे आगामी काळात दिसेलच, पण काँग्रेस येणार्या निवडणुकीत तितक्या ताकदीने उभा राहिला नाही तर काँग्रेसचं पुढचं भवितव्य बरचं अंधारात जावू शकतं. दुसरीकडे आम आदमीही 2024 च्या निवडणुकीत आपला जोर लावणार आहे. देशभरात आप उमेदवार उभा करु शकतो. काँग्रेस पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न होवू शकतो. आपमुळे काँग्रेसचं नुकसान होणार आहे. काँग्रेसचं नुकसान व्हावं असं भाजपाला वाटत आहे, पण आप काँग्रेससह भाजपाचं सुध्दा नुकसान करु शकतं. आपने लोकसभा पन्नास पर्यंत खासदार निवडून आणले तर हा पक्ष ‘बाप’ बनू शकतो. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आप निर्णायक ठरू शकतो, त्या दिशेने या पक्षाची वाटचाल सुरु आहे.










