लोकाहो, काळजी घ्या, घरात रहा; स्वारातीच्या डॉक्टरांचे कळकळीचे आवाहन
अंबाजोगाई (रिपोर्टर):- अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मृत्यू आपल्या दारात उभा येवून ठाकला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने लोकाहो काळजी घ्या, घरातच रहा अस म्हणत स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयाचे उपाअधिक्षक डॉ.विश्वजीत पवार, डॉ.अरूण केंद्रे, डॉ.प्रमोद दोडे, डॉ.नागेश अब्दागीर यांनी आवाहन करत गेल्या 24 तासात नऊ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आज त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नऊ शव नगर पालिकेला दिल्याचे सांगितले.
स्वारातीच्या डॉक्टरांनी आज अत्यंत भावनिक आवाहन करून लोकांनी आपला जीव वाचवावा म्हटले आहे. गेल्या 24 तासामध्ये स्वारातीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून त्यांचे शव अंत्यविधीसाठी नगर पालिकेच्या स्वाधीन केल्याचे म्हटले आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मृत्यू आपल्या दारात उभा आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी घराच्या बाहेर निघतांना खबरदारी घेवून बाहेर पडावे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर जावे नसता घराच्या बाहेर निघुच नाही. कोरोना प्रत्येकाच्या जवळ येवून थांबला आहे. ह्याला थोपवायचे असेल तर शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करावे. आज दुर्दैवाने नऊ कोरोना बाधितांचे शव जड अंत:करणांनी आम्ही अंत्यविधीसाठी नगर पालिकेच्या स्वाधीन केले आहे. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर सर्व नियमांचे पालन करा, काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले.