बीड (रिपोर्टर) गेल्या वर्षी कापसाला या महिन्यात दहा हजाराच्या पुढे भाव मिळाला होता. यंदा मात्र सुरूवातीला चांगला भाव मिळाला. काही दिवसापूर्वी कापसाचे भाव कमी झाले. सध्या कापूस आठ हजारापर्यंत खरेदी केला जातो. कापसाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकर्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवून ठेवणे पसंत केले. गेल्या पंधरा ते तीन आठवड्यामध्ये कापसाची खरेदी-विक्री अत्यंत कमी प्रमाणात झाली असल्याचे दिसून येवू लागले. भाव कमी झाल्यामुळे कापसाचा बाजार थंडावला आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक कापसाचे उत्पादन घेतले जावू लागले. कापूस नगदी पिक म्हणून ओळखले जाते. दरवर्षी कापसाचे चांगले उत्पन्न निघू लागल्याने शेतकर्यांचा दिवसेंदिवस कल कापूस लागवडीकडे वळला. कधीकधी कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकर्याचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडते. गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाजारात कापसाला चांगला भाव मिळाल्याने स्थानिक शेतकर्यांना त्याचा फायदा झाला. अतिरिक्त पावसाने कापसाचे नुकसान होवूनही गेल्यावर्षी काही शेतकर्यांना दहा ते चौदा हजारापर्यंत भाव मिळाला. गतवर्षी चांगला भाव मिळाल्याने यावर्षी शेतकर्यांनी जास्त प्रमाणात कापूस लावला असल्याचे दिसून आले. यावर्षीही अतिरिक्त पावसामुळे बर्याच ठिकाणी कापूस पिकाचे नुकसान झालेले आहे. सध्या कापसाची खरेदी विक्री सुरू असली तरी तितक्या तेजीत कापूस खरेदी होताना दिसून येत नही. मध्यंतरी कापसाला दहा हजाराच्या पुढे भाव होता. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी कापूस विकला. मात्र सध्या कापसाचे भाव कमी झाले. कापूस आठ हजारावर आला. भाव कमी झाल्यामुळे शेतकरी कापूस विकण्यापेक्षा घरात साठवून ठेवण्यात पसंती देवू लागले. कापसाला दहा हजाराच्या पुढे भाव आल्यावरच विक्री करण्याचा मानस अनेक शेतकरी व्यक्त करू लागले. भाव पडल्यामुळे जिनींगमध्ये तितक्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी येत नसल्याने कापसाचा बाजार सध्या तरी चांगलाच थंडावला असल्याचे दिसून येवू लागले आहे.