बीड (रिपोर्टर) नगर शहरातून दुचाकी चोरून त्या बीड जिह्यात विकणा़र्या सराईत दुचाकीचोराला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 15 लाख रुपयांच्या चोरीच्या 23 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. किसन उर्फ कृष्णा पोपट सापते (वय 26, रा. खकाळवाडी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
किसन सापते हा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याची बीड जिह्यात ओळख होती. या ओळखीतून चोरीच्या दुचाकी त्याने 70 ते 80 हजार रुपये किंमतीला जवळचे नातेवाईक, मित्र-परिवार यांना विक्री केल्या असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आता पोलिसांनी सर्व दुचाकी जप्त केल्याने चोरीच्या दुचाकी विकत घेणार्यांचीही फसवणूक झाली आहे. 28 एप्रिल 2022 रोजी दुपारी किसन सापते याने प्रोफेसर कॉलनी चौकातून सुनील भानुदास सरोदे यांची बुलेट दुचाकी चोरली होती. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली होती. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान किसन सापते याने हा गुन्हा केल्याचे समोर आल्याने तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध ठिकाणांहून विविध कंपन्यांच्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 15 लाख 90 हजार किमतीच्या दुचाकी काढून दिल्या. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती सापते याला समजल्याने सरोदे यांची दुचाकी भिंगारमध्ये सोडून तो पसार झाला होता. तोफखान्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके, हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, अहमद इनामदार, शैलेश गोमसाळे, कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, सचिन जगताप, धीरज खंडागळे, चेतन मोहिते, गौतम सातपुते, अतुल कोतकर, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.