Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमचालकास लुटणार्‍या चोरट्यांच्या केज पोलिसांनी आवळल्या मुसक्या

चालकास लुटणार्‍या चोरट्यांच्या केज पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आज पहाटे केली कारवाई; तिघे जण अटक
केज (रिपोर्टर):- केजहून धारूरकडे जाणार्‍या एका चालकाला अंगावर थुंकल्याचा बहाणा करत तिघा जणांनी मारहाण करून त्याच्याकडील नगदी रकमेसह मोबाईल चोरून नेला होता. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावला. आज पहाटे धारूर येथून तिघा जणांना ताब्यात घेतले. या चोरट्यांकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला.
  गौतम ज्ञानोबा भालेराव (वय 49 रा. चोरांबा ता. धारूर) हे 10 मे 2021 रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान केजहून धारूरकडे जात होते. रस्त्यात एका स्कुटीवर तिघे जण आले. या तिघांनी भालेराव यांना ‘तू आमच्या अंगावर थुंकला’, असे म्हणत त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळील नगदी 5 हजार700 व सात हजार रुपयांचा जीओ कंपनीचा मोबाईल हिसकावला. या घटनेनंतर भालेराव यांनी धारूर पोलीस ठाणे गाठले मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडली ती हद्द केज पोलीस ठाण्यात येत असल्याने त्यांनी दुसर्‍या दिवशी केज पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या चोरट्यांचा माग काढला. सदरील हे चोरटे धारूर येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज पहाटे अनिल ऊर्फ मंगेश बालाजी सोनटक्के (वय 20, रा. अशोकनगर धारूर), शिवराम वैजिनाथ बोबडे (वय 30, रा. संभाजीनगर धारूर) आणि रेवण सोपान नखाते (वय 30, रा. कसबा धारूर) या तिघांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई डीवायएसपी भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिसळे, पीएसआय काळे, दिलीप गिते, महादेव बहिरवाळ, थोरात यांनी केली. या चोट्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Most Popular

error: Content is protected !!