गणेश सावंत
मो. नं. 9422742810
शरद पवार…! महाराष्ट्राच्या राजकारणातलं नव्हे नव्हे तर देशातल्या राजकारणातलं एक वादळ. महाराष्ट्रातल्या राजकारणातले भिष्माचार्य. देशाच्या राजकारणातला एक अविभाज्य घटक. जो काळालाही स्वत:च्या विजयश्रीत नाचवयास भाग पाडणारा तेल लावलेला पहेलवान. अशा एक ना अनेक बिरुदावली लावल्या तरी शरद पवारांच्या कर्तृत्वाचे कौतुक त्या बिरुदावलीतून संपुर्ण होणार नाही. पुन्हा एकदा शरद पवार महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात चर्चेत आले. वयाच्या 83 व्या वर्षी पवारांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा देत एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला अन् महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एक वादळ उठलं. ते वादळ समर्थकांचे भविष्य उधळून टाकणारं होतं. तर फुटीरवाद्यांच्या पदरात सत्तेचं माप टाकणारं समजलं गेलं. परंतु शरद पवारांचे आजपर्यंत घेतलेले निर्णय हे भावनिक होऊन कधीच नव्हते. पवारांचे निर्णय हे बुद्धी आणि तर्काच्या जोरावर असतात. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा निर्णयाबाबत राज्यात आणि देशात खल तर होणारच होती आणि ती खल दोन दिवस अनेक राजकारण्यांसह राजकीय विश्वलेषकांनी केली. परंतु शरद पवारांच्या त्या निर्णयाचा तळ या सर्वांना लागला असेलच हे सांगणे कठीण. शरद पवार यांचे गेल्या साठ वर्षांचे समाजकारण तुमच्या -आमच्या लक्षात येईल. परंतु पवारांचे राजकारण हे भल्या भल्यांच्या लक्षात कधीच येत नाही. पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना आम्हीही त्यांच्या साठ वर्षांच्या राजकीय प्रवासावर आणि निर्णय क्षमतेवर नजर फिरवली तर आम्हालाही पवारांच्या या निर्णयाबाबत ठोस सांगणे कठीण. परंतु पवारांचा हा निर्णय
पक्षातील फुट
टाळण्यासाठी अटळ मानला जातो. यात दुमत असण्याचे कारण नाही. कारण देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ताकारणासाठी ज्या पद्धतीने छोट्या-मोठ्या पक्षात आराजकता माजवत आहे, खोक्याच्या जोरावर मतलबी बोक्यांना आपल्याकडे घेत आहे, त्यावरून स्वत:च्या पक्षात फूट अटळ असणे अन् ती शरद पवारांना न जानवणे हे होऊच शकत नाही. पहाटेच्या शपथविधीपासून सतर्क झालेल्या पवारांनी आपले पुतणे अजित पवारांच्या काटावरच्या धोरणावर चांगलेच लक्ष केंद्रित केले. मध्यंतरी अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची बाळलेली मनिषा, ठिकठिकाणी लागत असलेले पोस्टर हे शरद पवारांच्या खेम्यामध्ये अस्थिरतेची चुणूक दाखवून देत होते. अशा स्थितीत इतर पक्षांना चाणक्य नितीतून सावरण्यास मदत करणारे शरद पवार स्वत:च्या पक्षातील अस्थिरता शमवू का शकणार नाहीत. बुद्धी तर्काच्या जोरावर शरद पवारांनी राजीनाम्याच्या सोंगट्या फेकल्या आणि त्या सोंगट्यातून आलेले नंबर काकांना विजयी करतात की पुतण्याला विजयी करतात, हे गेल्या दोन दिवसात पाहण्यालायक ठरले. शेवटी काका ते काकाच राहिले आणि पुतण्याला ‘काका मला वाचवा हो…’चा अनुभव देता आला. शरद पवारांचं राजकारण आणि राजकारणात फेकले जाणारे त्यांचे फासे समजणे साक्षात
काळालाही अशक्य. म्हणूनच शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील अन्य पक्षांच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया शरद पवार राष्ट्रवादीसाठी जेवढे महत्वाचे तेवढे देशाच्या राजकारणासाठी महत्वाचे मानता येतात.
ऐन सुगीत
शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय पक्षासाठी आतबट्ट्याचा तर नव्हे, शरद पवारांना आपल्या पक्षाला भाजपासोबत तर पाठवायचं आहे, अशा एक ना अनेक तर्कावर आधारलेल्या चर्चा या तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या. 2024 च्या निवडणुका जवळ आलेल्या असताना शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, हे अनेकांच्या पचणी पडत नव्हते. जे शरद पवार वयाच्या 80 व्या वर्षात भर पावसात सभा घेऊन महाराष्ट्राचं वारं पलटवू शकतात, जे शरद पवार अशक्य ते शक्य करून दाखवू शकतात त्या शरद पवारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवृत्तीचा निर्णय घेणे म्हणजे त्या मागे नक्कीच काय तरी कारणे तेही भारतीय जनता पार्टीला मदत होईल, असे. हे तर्क अनेकांनी काढले. परंतु शरद पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत जोडण्यापेक्षा जे भाजपा सोबत जोडले जाण्याची शक्यता आहे अशांना चपराक देण्याइरादे घेतलेला हा निर्णय महत्वपुर्ण मानला जातो. शरद पवार ही एक अशी हस्ती आहे, एक तर ते आपल्या विरोधकांना पाहिजे ते तात्काळ देतात आणि त्यातून रोपट्याला कलम केल्यागत राजकीय नवी जात निर्माण कशी होईल याकडे लक्ष देतात. नाही तर शरद पवार हे विरोधकांना पाहिजे ते घेत असतील अन् ते पवारांना द्यायचे नसेल तर शरद पवार असा काही निर्णय घेतात, देणारालाही देता येत नाही अन् घेणारालाही घेता येत नाही, तसाच काहीसा निर्णय शरद पवारांनी राजीनाम्याचा घेतला. अजित पवारांनी जी अस्थिरता निर्माण केली त्या अस्थिरतेमुळे शरद पवारांच्या
धर्मनिर्पेक्षतेला धोका
निर्माण झाला. पक्षाच्या स्थापनेपासून भाजपसोबत न गेलेल्या पवारांवर भाजपसोबत चलण्याचा सर्वाधिक दबाव आज पक्षातूनच आहे. त्याचवेळी भाजपसोबत जाऊ नये, असे मानणारेही काही नेते आहेतच. त्यांच्यापैकी कोणाच्या बाजूने कौल द्यावा ही खरी कोंडी आहे. वैचारिकतेची कास कायम ठेवायची की सत्तेसाठी व्यवहारवाद स्वीकारायचा याचा फैसला करायचा आहे. तीन-चार महिन्यांत तो करावाच लागेल. पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा करून शरद पवार यांनी अजित पवार यांची कोंडी केल्याचा तर्क काही जण लावत आहेत. घोषणेनंतर भावनांचा जो बांध फुटला त्यातून पक्ष माझ्या सांगाती’ हे दाखवून देण्यात साहेब यशस्वी झाले असले तरी सगळे बेंबीच्या देठापासून आर्जव करत असताना अजित पवार मात्र ’नवीन अध्यक्ष आले तर काय हरकत आहे?’ असा सूर लावत होते. पुतण्याचा हा सूरच काकांसाठी मोठी डोकेदुखी आहे आणि राहील. भावनाविवश झालेल्या नेत्यांची ताकद एकत्र केली तरी अजित पवारांची ताकद अधिक आहे. भावना अनावर झालेल्यांपैकी बरेच जण अजितदादांसोबत आहेत. इतकी वर्षे धर्मनिरपेक्ष नेता ही प्रतिमा टिकवणार्या पवारांना आयुष्याच्या संध्याकाळी भाजपसोबत जायचे नाही आणि पक्षातील फूटही टाळायची आहे. त्यासाठी हरेक प्रयत्न ते करत आहेत हा त्यांच्या राजीनाम्याचा अर्थ मानला तर ते चुकीचे ठरणार नाही. शरद पवार आणि
‘लोक माझ्या सांगाती ’
हे एकच मानलं जातं. कारण पवारांच्या उभ्या आयुष्यावर ‘लोक माझ्या सांगाती’तून प्रकाश टाकला आहे. परंतु आम्ही इथेही लोक माझ्या सांगातीत संपुर्ण शरद पवार आलेत काय? कारण बुद्धी आणि तर्काच्या जोरावर जे लोक निर्णय घेतात ते सातत्याने हातचे राखून ठेवतात. परंतु जे काही लोक माझ्या सांगातीत आले आहे ते पाहिल्यानंतर शरद पवार हे कोणाच्याच हाताला लागले नाहीत. ते पुतण्याच्या हाती कठपुतली कसे होतील? असे वक्तव्य एका विश्वलेषकाने केले ते सत्य मानले पाहिजे. शरद पवार हे महाराष्ट्रासाठीच नव्हेतर देशासाठी एक महत्वाचे नेते आहेत. त्यांची निवृत्ती ना महाराष्ट्राला परवडणारी, ना देशाला परवडणारी. म्हणूनच पक्षातील समर्थकांसह विरोधी पक्षातल्या अनेक बड्या नेत्यांनी राजीनाम्यावर फेरविचार करण्याबाबत शरद पवारांशी चर्चा केल्याचे पक्षाकडून सातत्याने सांगण्यात येते. शरद पवार हे जसे तेल लावलेले पहेलवान म्हणून सुपरिचीत आहेत तसे त्यांच्या राजकारणाचा तळ कोणालाही सापडलेला नाही. याचे ताजे उदाहरण आदानींच्या भेटीवरून उभ्या देशाने पाहिलेले आहे. अशा या राजकारणातील भिष्माचार्याची गरज आणि फुटीरवाद्यांसाठी समज पवारांकडूनच महत्वाची…! महाभारतात भिष्माचार्य बाणावर राहिले, परंतु इथं शरशय्येवर मी राहणार नाही तर माझ्या मनाविरुद्ध अथवा पक्षाच्या विचारसरणीविरुद्ध जो कोणी जात असेल त्याला नक्कीच शरशय्येवर निजावे लागेल.
उद्याच्या अंकात वाचा
गडावरून उड्या टाकून मरा, नाही तर लढून मरा