Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeक्राईममांजरसुंब्याजवळ अपघात, शेतकर्‍यासह म्हैस ठार

मांजरसुंब्याजवळ अपघात, शेतकर्‍यासह म्हैस ठार


संतप्त नागरिकांनी महामार्ग दोन तास
रोखून धरला, महामार्ग पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

नेकनूर (रिपोर्टर)- म्हशींना शेतात घेऊन जाणार्‍या शेतकर्‍याला चौसाळ्याकडून येणार्‍या ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात सदरील शेतकरी जागीच ठार झाला. तर या ट्रकने तीन म्हशींना चिरडल्याने एक म्हैस मृत्यूमुखी पडली तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्या. सदरची घटना आज सकाळी मांजरसुंबा जवळील शिवाजीनगर वस्तीनजीक घडली. अपघाताची घटना घडल्यानंतर वस्तीवरील शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरत या अपघातास महामार्ग पोलिस जबाबदार आहेत, असं म्हणत रस्ता रोखून धरला. दीड ते दोन तास रस्ता रोखल्या गेल्याने या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलिस हप्ता घेण्यात मश्गुल असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपस्थितांनी केली.
उदंडवडगाव-शिवाजीनगर येथील ५५ वर्षीय भानुदास वाघिरे हे आज सकाळी आपल्या म्हशी घेऊन शेताकडे निघाले होते. त्यावेळी ते रस्त्याने जात असताना चौसाळ्याकडून भरधाव वेगात येणारी ट्रक (क्र. आर.जे. ४० जीबी ३९४५) या ट्रकने वाघीरे आणि त्यांच्या सोबतच्या म्हशींना जोराची धडक दिली. या अपघातात भानुदास वाघिरे हे जागीच ठार झाले तर ट्रकच्य चाकाखाली चिरडल्याने एक म्हैस मृत्युमुखी पडली, अन्य दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती कळताच जवळच असलेल्या शिवाजीनगर वस्तीवरील शेकडो नागरिकांनी महामार्ग रस्त्यावर उतरून महामार्ग पोलिसांच्या विरोधात संताप व्यक्त केला. जोपर्यंत महामार्ग पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत एकही गाडी हलू देणार नाहीत, अशी भूमिका घेतली. महामार्ग पोलिस हप्ता गोळा करत असल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. तब्बल दीड ते दोन तास नागरिक रस्त्यावर उतरल्यामुळे या महामार्गावर तीन ते चार किलोमिटर ट्रॅफीक जाम झाली होती. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पीएसआय विलास जाधव, पोलिस कर्मचारी ढाकणे, राठोड, वाघमारे, राऊत, अमोल नवले, घुले, चव्हाण आदींनी धाव घेतली. संतप्त जमावास त्यांनी शांत केले. त्यानंतर सदरचा महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला झाला.
०००००

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!