Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा राजीनामा

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा राजीनामा

बंगळुरू : कर्नाटकचे ७८ वर्षीय मावळते मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन अखेर आपला राजीनामा सादर केलाय. राज्यपालांनीही ताबडतोब मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारलाय. मात्र, पुढील मुख्यमंत्री आपल्या पदाची शपथ घेईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी येडियुरप्पांना केली.

आपल्या भाषणात राजीनाम्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांना भावना अनावर झालेल्या दिसल्या. ७५ वर्षांहून अधिक वय असूनही दोन वर्ष मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी देण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.

अखेर, कर्नाटक मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा

मी दु:खी होऊन नाही तर आनंदानं हा निर्णय घेतलाय. राजीनाम्यासाठी कुणीही माझ्यावर दबाव टाकला नाही. सरकारची दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर इतर कुणी ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी हा निर्णय मी स्वत: घेतलाय. राज्यपालांनी माझ्या राजीनाम्याचा स्वीकार केला आहे. भविष्यातही पक्षाच्या विविध कार्यात सहभागी राहील. आगामी निवडणुकीत पक्षाला सत्तेत आणण्यासाठीही काम करेन, असं राजीनाम्यानंतर येडियुरप्पा यांनी म्हटलंय.

येडियुरप्पा यांना केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान, गृहमंत्र्यांसहीत अनेक ज्येष्ठ नेत्यांची भेटीगाठीही घेतल्या होत्या. तसंच गेल्या आठवड्याभरापासून कर्नाटकातील प्रभावी अशा लिंगायत समुदायानंही येडियुरप्पा यांना आपला पाठिंबा व्यक्त करत आपला दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, अखेर आज आपल्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच बी एस येडियुरप्पा यांनी आपला राजीनामा सोपवलाय.

Most Popular

error: Content is protected !!