Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रकोकणदु:खद अंत:करणानं ‘त्या’ 31 जणांना मृत घोषीत करणार, तळीये दुर्घटनेतील मृतांचा आकडा...

दु:खद अंत:करणानं ‘त्या’ 31 जणांना मृत घोषीत करणार, तळीये दुर्घटनेतील मृतांचा आकडा 50 च्या वर

; शोध मोहीम सुरुच
रायगड (रिपोर्टर):- तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांचा शोध गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. काल ढिगार्‍याखालून 11 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. मात्र अद्याप 31 जण ढिगार्‍याखालीच असल्याने आता त्या सर्वांना मृत घोषीत करत त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी ढिगारा उपसण्याचे काम सुरुचर राहणार असल्याचे सांगितले.  
   तळीये इथे दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र आता ढिगार्‍याखाली अडकलेले मृतदेह तिथेच ठेवून, त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णयाकडे लोकप्रतिनिधी आणि मृतांचे नातेवाईक डोळे लावून बसले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी ढिगार्‍याखाली अडकलेले 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र, अजूनही 31 मृतदेह त्याच ठिकाणी असल्याची भीती वर्तवली जात आहे. आता या मृतदेहांना हात लावू नका, त्यांना मृत घोषित करा, असं या गावचे नागरिक आणि आपत्तीग्रस्त किशोर पोळ यांचं म्हणणं आहे. तसंच गावचे सरपंच संपत चांदेकर म्हणाले की, आता या मृतदेहांचं विघटन सुरु झाल्यामुळे त्यांना बाहेर काढणं आणखी कठीण होणार आहे. ते पाहून त्यांच्या नातेवाईकांना अधिकच दुःख आणि वेदना होतील. त्यामुळे त्यांना बाहेर न काढणंच योग्य असल्याची भावना मृतांच्या नातेवाईकांनीही व्यक्त केली आहे. गावातले लोकप्रतिनिधी आणि मृतांच्या नातेवाईकांनी आता मृतदेहांची अधिक विटंबना न करता त्यांना मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर दस्ताऐवजांची पूर्तता शासनाने करावी अशी मागणी केली आहे.
मात्र, जिल्हाधिकार्‍यांनी बचाव आणि मदतकार्य सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली आहे. गावातल्या सगळ्या नागरिकांनी जरी विरोध केला तरी हे काम सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एकूण एक बेपत्ता व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत हे मदत आणि बचावकार्य सुरुच राहील, अशी भूमिका जिल्हाधिकार्‍यांनी मांडली आहे. या भागातलं मदत आणि बचावकार्य थांबवण्याबाबत आज निर्णय होणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!