गणेश सावंत
मो. नं. 9422742810
हा माझ्या पित्याचा पक्ष आहे, माझ्या बाजुला ते कमळाचं फूल आहे, त्यामध्येच माझा पिता विसावला. मी याआधीही भूमिका स्पष्ट केली आहे, तीच ती भूमिका सातत्याने सांगणार नाही, माझी भूमिका लेचीपेची नाही, माझा नेता अमित शहा आहेत. त्यांना मी वेळ मागितलाय. त्यांच्या सोबत मी एकदा चर्चा करणार आहे. गेल्या साडेचार वर्षातला कालखंड मांडणार आहे आणि त्यानंतर थेट तुमच्या समोर येऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. मी कुणाच्या खांद्याचा वापर करत नाही, माझे खांदे प्रचंड रुंदावलेले आहेत, त्या खांद्यावर अनेकजण बंदुका ठेवू पाहात आहेत. माझं राजकारण हे तुमच्यासाठी आहे. तुमचं प्रेम, तुमचा आशिर्वाद महत्वाचा आहे असं म्हणत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी गेल्या साडेचार – पाच वर्षापासून पक्षात होत असलेल्या घुसमटीला अंतिम आणि निर्णायक स्वरुप दिले. पंकजा मुंडे पक्षात नाराज आहेत की नाही, याचे उत्तरही काल मिळाले. अखंड भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजांचं नेतृत्व करण्यासारखा केवळ एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे अमित शहा हे पंकजा मुंडेंनी बोलून दाखवून पक्षातल्या अन्य नेतृत्वांना एकप्रकारे स्पष्टतेचा आणि निर्णायक इशाराच दिला. माझ्या बोलण्यातून अनेक अर्थ-गैरअर्थ काढले जातात, हे बोलतानाच पंकजांनी आणखी एक वाक्य म्हटले ते म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ ज्याला समजायचा त्याला समजतो. याचाच अर्थ पंकजा जेव्हा जेव्हा जे जे काही बोलल्या आहेत त्या विचारपूर्वक बोलल्या तर आहेतच आणि त्या बोलण्यातून अर्थ आणि अन्वयार्थ काढण्या हेतुच त्यांनी ते ते वक्तव्ये केलेले आहेत. पंकजा मुंडेंची ही स्पष्टता त्यांच्या
अवहेलनेचे कारण
होते का? पंकजा ज्या इच्छा शक्तीने बोलतात, जे टोकाचे वक्तव्ये करतात त्यामध्ये अहंकार आहे का? पंकजा मुंडे ज्या स्टाईलने वक्तव्ये करतात, ती स्टाईल महाराष्ट्राच्या मातीला आणि भाजपासारख्या पक्षातील कार्यकर्त्यांना (दोन प्रकारचे कार्यकर्ते, एक बहुजनांच्या झालरीतले आणि दुसरे मंदिरात घंटा बडवणारे) यांना पटणारे आहे का? पंकजा मुंडेंच्या पाठिशी महाजन-मुंडेंची पुण्याई असताना त्यांची वाताहात का झाली? या वाताहातीला पंकजा मुंडेंचा स्वभाव जबाबदार आहे की तंची कार्यप्रणाली? असे एक ना अनेक प्रश्नांवर लोक चर्चा करतात. अनेक जण पंकजांच्या स्वभावाला जबाबदार धरतात. अनेक जण पंकजांच्या राजकीय महत्वाकांक्षेसह इच्छाशक्तीला समोर मांडून पंकजांच्या भूमिकेवर भाष्य करतात. परंतु या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधताना आजच्या भाजपाला
बहुजनांचं नेतृत्व नकोय
असे स्पष्ट जाणवते. इ.स. 1995 सालच्या अगोदर भाजपाची दशा आणि दिशा पाहितली तर जिथं भाजपाचं रोपटंही नव्हतं, भाजपाकडे केवळ शेठजी भटजीचा पक्ष म्हणून पाहितलं जात होतं तिथं स्व. गोपीनाथराव मुंडेंसारक्या वादळी नेतृत्वाने ओबीसीची झालर हिंदुत्वाच्या विचाराला जोडून महाराष्ट्रात भाजपाची जी ताकत वाढवली ती रोपट्यातून वटवृक्षासारखी भाजप वाढवण्यामध्ये स्व. गोपीनाथराव मुंडेंचा खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. परंतु आज ज्या विचारधारेतून भाजपाचं नेतृत्व काम करतय, मग ते केंद्रातलं असो अथवा महाराष्ट्रातलं असो. ती विचारधारा महाराष्ट्राच्या मातीत बहुजनाचं नेतृत्व करणार्या नेत्यांना नक्कीच पसंत नाही. या उलट बहुजनांचं नेतृत्व महाराष्ट्रात फुलतं, हे कडवट हिंदुत्ववादी विचारधारेला आणि त्या विचारधारेचा पगडा असणार्या भाजपातील नेतृत्वांना माहित असल्या कारणाने स्लो पॉईजन द्वारे बहुजन नेतृत्वांचा काटा काढला जातो. मग त्यात एकनाथ खडसेंचा उदाहरण असो अथवा गेल्या साडेपाच वर्षांच्या कालखंडामध्ये पंकजा मुंडेंना दिली जात असलेल्या वागणुकीतूनही समोर येते. पंकजा मुंडेंनी अनेक वेळा महाराष्ट्राच्या पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत ते आपले नेते नाहीत, हे स्पष्ट सांगितले. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातील नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी शह-काटशहाचे राजकारण तर केलेच या उलट पंकजांना शह देण्या इरादे वंजारा समाजातील अन्य लोकांना बळ देण्याचा प्रयत्नही केला. परंतु महाजन – फडणवीसांच्या कर्तृत्व-कर्माची पुण्याई आजही पंकजा मुंडेंना तारून आहे. म्हणूनच
समाजातलं अन्य नेतृत्व
पंकजा मुंडेंच्या विरोधकांना जसं फुलावं वाटतं तसं फुललेलं नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पंकजांचा पराभव झाला आणि त्या पराभवामध्ये स्वत:च्याच पक्षातील काहींचा हात असल्याचे पंकजांनी स्पष्ट सांगितले. तेथूनच पंकजा मुंडेंचे पक्षातील वजन कमी करण्याचा प्रयत्न होत गेला. भागवत कराड सारख्या अडगळीला असलेल्या व्यक्तीला मार्केयमध्ये आणण्यात आलं. त्यांना खासदारकी देण्यात आली. तिथपर्यंत पक्ष थांबला नाही तर त्यांना मंत्रीपदही बहाल करण्यात आलं. रमेश कराड सारख्या व्यक्तींना उेदवारी देताना पंकजा मुंडेंना विश्वासात घेतलं नाही. वीस-पंचेवीस आमदार-खासदार झाले असतील, यामध्ये पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली नाही. यातून एक स्पष्ट होते, काहीही झालं तरी पंकजांना मोठं होऊ द्यायचं नाही. या सर्व पक्षांतर्गत पंकजा विरोधकांना साडे चार वर्षे जी यशस्वी खेळी खेळण्यात यश आलं, त्यात पंकजांच्या स्वभावानेही त्यांना बरीच मदत केली. यातही तीळमात्र शंका नाही. मात्र ज्या विचारधारेच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये भाजपाने काम करणे गरजेचे होते तीच विचारधारा संपुष्टात येत असल्याने आणि पंकजा मुंडे सातत्याने बहुजनांच्या व्यासपीठावरून आवाज उठवत असल्याने भविष्यात खरचं पंकजा मुंडेंना भाजपात अनन्यसाधारण महत्व दिलं जाईल का ? याबाबत शंकाच.
पंकजा मुंडेंचा आवाज
हा भाजपासाठी अहंकारी आहे का? हा सातत्याने प्रश्न उपस्थित केला जातो. किंवा पंकजा मुंडे अहंकारी आहेत यावर चर्चा सातत्याने होते. मग ती घडवून आणली जाते, की पंकजा मुंडे खरचं त्या स्वभावाच्या आहेत, यावर विचारमंथन करताना जेव्हा पंकजा मुंडे बहुजनांच्या विचारपिठावर उभ्या राहतात तेव्हा लोकांकडे पाहून ‘माझं राजकारण हे फक्त तुमच्यासाठी आहे’, हे सातत्याने स्पष्ट करतात. बहुदा त्यांच्या या राजकीय विचारधारेला भाजपात स्थान नसावं, परंतु त्यांच्या या आवाजाला बहुजनांमध्ये स्थान मिळतं, म्हणूनच त्यांच्या कार्यक्रमाला गर्दीही होते, स्व. गोपीनाथराव मुंडे यांनीही पक्षविरहीत काही विचारधारेला आपल्या भूमिकेतून समोर मांडले. गोपीनाथ गडावरच्या कालच्या भाषणामध्ये पंकजा मुंडेंनी काही उदाहरणेही दिले. मग औरंगाबादच्या विद्यापीठाला देण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या बाबतीत असो, मंडल आयोगाच्या बाबतीत असो, ओबीसींच्या प्रश्नांबाबत असो, आणि आपणही त्याच भूमिकेत आहोत, पंकजा मुंडेंचा हा आवाजच भाजपाच्या विचारधारेला खटकतोय का? हा कोणालाही प्रश्न आता पडेल. आतापर्यंत नक्कीच पंकजा मुंडेंना आतीताईपणा, त्यांचा अहंकार, त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या पडत्या राजकारणाचा भाव असल्याचे म्हटले जायचे, मात्र हळूहळू भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने पंकजांना ट्रिट करणे सुरू केले तेव्हा स्व. मुंडेंच्या अनुयायांबरोबर बहुजन विचारसरणीने पछाडलेल्या अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनाही पंकजांच्या बाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबत सकारात्मकता वाटू लागली हे पंकजांसाठी आजमितीला जमेची बाजू. बहुदा तीच जमेची बाजू ओळखून
पंकजा मुंडे निर्णायक क्षणावर
येऊन तांबल्या आहेत. काल त्या कितीही म्हणत असल्या, माझ्या चेहर्यावर तणाव, नाराजगी दिसते का? परंतु त्यांच्या तना-मनात त्यांच्या अवहेलनेबाबत जी आग आहे ती मात्र काल त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होती. आम्ही दावा करणार नाहीत, परंतु गेल्या वीस-पंचेवीस वर्षाच्या कालखंडाच्या अनुभवावर आम्ही एवढे मात्र म्हणू, पंकजा मुंडे कालच एका घावात दोन तुकडे करायला तयार होत्या. तशी तयारीही बहुदा झालेली होती, परंतु एकनाथ खडसे आणि त्यांच्यामध्ये जी अर्ध्या-एका तासाची गुफ्तगू झाली त्या गुफ्तगूमध्ये एक घावात दोन तुकड्याला तात्पुरता थांबा देण्यात आला. म्हणूनच पंकजांनी आता शेवटच्या आणि निर्णायक क्षणावर आल्याचे स्पष्ट करत मी एकदा माझे नेते अमित शहा यांची भेट घेणार आहे, त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा करणार आहे, आणि त्यानंतर उघडपणे तुमच्या समोर येऊन भूमिका स्पष्ट करणार आहे, असे म्हटले. पंकजा मुंडे वगळता भाजप हे जर 2024 चे समिकरण आपण डोळ्यासमोर मांडलं आणि गेल्या चार-साडेचार वर्षांच्या कालखंडामध्ये भाजपाने सत्तेसाठी महाराष्ट्राला ज्या पद्धतीने वेठीस धरलं त्याची गोळाबेरीज केली तर भाजपाच्या या वटवृक्षाला किती मोठी आग लागेल आणि त्या वटवृक्षाच्या फांद्या कशा जळतील हे सांगणे कठीण आहे. पंकजा एवढ्या सोप्या नाहीत हे सत्य असले तरी पंकजांच्या स्वभावामुळे त्या विरोधकांना अत्यंत सोप्या आहेत. म्हणूनच गेल्या साडेचार वर्षाच्या कालखंडात पंकजांची मोठी ताकत बगलेतल्या दोर्यात पंकजांच्या पक्षांतर्गत विरोधकांना बांधता आली.