बीड (प्रतिनिधी):- बीड शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये रोजगाराची कुठलेही साधन नसून नागरिक वीज, पाणी आणि रस्त्यामुळे आधीच परेशान आहेत. हे बेरोजगार युवक उपजिविकेसाठी छोटे-मोठे व्यवसाय करून आपल्या परिवाराची उपजिविका भागवत आहेत. अतिक्रमणाच्या नावाखाली जर त्यांचे व्यवसाय बंद पडले तर हजारो परिवारावर उपासमाराची वेळ येईल. आधी त्यांचे विस्थापन करा आणि नंतर अतिक्रमण हटवा गोरगरिबांच्या घराला आणि व्यवसायाला मी धक्का लागू देणार नसून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करील असा इशारा आ.संदीप क्षीरसागर यांनी तहसीलदार आणि महसूल अधिकार्यांच्या आज घेतलेल्या बैठकी प्रसंगी दिला.
बीड शहराच्या हद्दवाढ भागांमध्ये नगर परिषद हद्द वाढल्यामुळे खंडेश्वरी मंदिर परिसर, बार्शी नाका, पांगरी रोड, एमआयडीसी, इमामपूर रोड, धानोरा रोड, पालवन रोड, रामतीर्थ भागात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून छोटा-मोठा व्यवसाय करून ते आपली उपजिविका भागवत शासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून यामुळे या भागातील नागरिकांचा व्यवसाय आणि घर उध्वस्त करण्याचा डाव चालविला आहे. अतिक्रमण हटवा यास माझा विरोध नाही पण या भागातील नागरिकांना आधी राहण्याची आणि व्यवसायाची सुविधा करून द्यावी.