बीड (रिपोर्टर) शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने बीड मतदारसंघात अनेक ठिकाणी गावकर्यांनी अभिष्टचिंतन सोहळे ठेवत कुंडलिक खांडे यांचा सत्कार केला. जनप्रेमाबरोबर काल कुंडलिक खांडे यांना संत-महंतांचे आशिर्वाद मिळाले. धाकटी पंढरी म्हणून समजल्या जाणार्या नारायणगड, गोरक्षनाथ टेकडी, श्रीक्षेत्र संस्थान रामगड येथील मठाधिपतींनी कुंडलिक खांडेंना शुभआशिर्वाद दिले.
म्हाळसजवळ्यासारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कुंडलिक खांडे यांनी अल्पावधीत बीडच्या राजकारणामध्ये आपली वेगळी छाप मारली. सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसापासून कष्टकरी, कामगार, शेतकर्यांचे प्रश्न ते सोडवत राहिले. त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात लोक उभे राहत असून काल त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या विविध कार्यक्रमातून दिसून आले. काल सर्वप्रथम जन्मगावी म्हाळसजवळ येथे ग्रामदैवतेचे दर्शन घेत आई-वडिलांचे शुभ आशिर्वाद घेतले तेव्हा गावकर्यांनी मोठा नागरी सत्कार ठेवला. पुढे ते श्रीक्षेत्र संस्थान गोरक्षनाथ टेकडी येथे ह.भ.प. शांताब्रह्म नवनाथ महाराज यांचे शुभ आशिर्वाद घेऊन मैंदा येथील संतोष घुमरे व त्यांच्या मित्र परिवाराने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शविली. बेलुरा येथील कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित सत्कार स्वीकारून नगदनारायण महाराजांचे दर्शन घेण्यासाठी ते नारायणगडावर गेले. त्याठिकाणी मठाधिपती ह.भ.प. गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी शुभआशिर्वाद दिले. पुढे ते श्रीक्षेत्र संस्थान रामगड येथे ह.भ.प. योगीराज महाराज यांचे आशिर्वाद घेण्यासाठी गेले. मौजे साक्षाळपिंप्री, महालक्ष्मी चौक बायपास व सायंकाळी शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात मोठा सत्कार समारंभ झाला. या वेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. नामलगाव येथील आशापुरक गणेश, पेंडगाव येथील मारुती मंदिरात जावून दर्शन घेतले. कुंडलिक खांडे यांनी मोठा जनसंपर्क उभारल्याचे यातून दिसून येत असून लोकांच्या प्रेमाबरोबर काल खांडे यांना संत-महंतांचे आशिर्वाद मिळाले.