विस्तारात दहा ते चौदा जणांचा समावेश, नाराजांसाठी महामंडळाची पेंड
बीड जिल्ह्याच्या आशा मावळल्या, विस्तारानंतर शिंदे गटात अस्वस्थता?
बीड (रिपोर्टर) शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचालींना वेग आला असून या मंत्रिमंडळात आपलीही वर्णी लागावी यासाठी भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांनी आपली ताकत लावायला सुरुवात केली आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा विस्तार जंबो नसून केवळ 10 ते 14 आमदारांना मंत्रिपद मिळणार आहेत. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षांवर विर्जन पडणार असल्याचे दिसून येते. त्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने इच्छुकांची बोळवण करण्यासाठी महामंडळ हा पर्याय निवडला आहे. काहींची महामंहळावर निवड केली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत बंडखोरी करत बाहेर पडलेले शिंदे गटातील अनेक आमदार अद्यापही मंत्रिपदाच्या आशेवर आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर भाजपाचे अमित शहा यांच्या आदेशानंतर आता होणार आहे. शिवसेना पक्षाच्या वर्धापनदिनाअगोदर हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता असून या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या सहा तर शिंदे गटाच्या चार आमदारांना स्थान मिळणार आहे. कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त चौदा जणांचा विस्तार होणार असल्याचे बोलले जाते. दहा जणांच्या विस्तारात शिंदे गटाला केवळ चार आणि चौदा जणांचा विस्तार झाला तर सात जणांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. आपलीच मंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी भाजपासह शिंठदे गटातील आमदारांनी आपआपली ताकत लावली आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार छोटा असल्याने अनेकांच्या अपेक्षा फोल ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकासमोर ठेवून हा विस्तार केला जात असून हट्टाला पेटलेल्या आमदारांना महामंडळ देऊन शांत केले जाण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारची असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या विस्तारात बीड जिल्ह्याला सामावून घेण्याची शक्यता मावळली असली तरी भाजपातील अंतर्गत वाद आणि वरचढपणाचे राजकारण यातून देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात एखाद्या आमदाराच्या डोक्यावर लाल दिवा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.