केज (रिपोर्टर) शहरातील छोट्या-मोठ्या व्यापार्यांवर अतिक्रमणाची कुर्हाड कोसळणार असून सदरील व्यापार्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील व्यापार्यांनी तहसीलदारांकडे केली. याबाबतचे निवेदन आज संघटनेच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात व्यापार्यांनी म्हटले आहे की, केज शहरातील लहान व्यापारी व टपरीधारक यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध नसल्याने संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलने व निवेदने तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना देण्यात आले होते. 270 मिटर लांबी व 30 मिटर रुंदी अशा रस्त्यालगत समांतर असलेल्या जमिनीचा ताबा नगरपंचायत यांच्या मार्फत व्यापारी टपरीधारक यांना देण्यात आला होता. सदरील मंजूरी देऊन 33 वर्षे संपले असून राजकीय व शासकीय वादात हे व्यापारी संकुल अद्यापही झाले नाही. शासनाने दिलेली फलोत्पादन खात्याची जमीन पडिक आहे. जिल्हाधिकारी यांना केजच्या लहान व्यापारी व टपरीधारकांना भाडे तत्वावर फलोत्पादन खात्याची जमीन उपलब्ध करून द्यावी व अतिक्रमणामुळे व्यापार्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी सय्यद माजेद, अनिल पांचाळ, शेख शफीक, अशफाक तांबोळी, विठ्ठल सत्वधर, महादेव गुंड, नाजेम कुरेशी, मुजफ्फरोद्दीन खतीब, शेख शाकेर यांनी प्रशासनाकडे केली आहे.










