अध्यक्ष पंकजा मुंडे तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाचे कराड यांची निवड
परळी (रिपोर्टर): वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज संचालक मंडळाची महत्वपुर्ण बैठक होत अध्यक्षपदी माजी मंत्री पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी माजी मंत्री धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष-उपाध्यक्षांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी धनंजय मुंडे यांच्याकडून अजय मुंडे यांनी अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा हृदयसत्कार केला. ही निवड गोपीनाथ गडावर झाली.
शेतकर्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून मुंडे बंधू-भगिनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान एकत्रित आल्या. कारखान्याला पुन्हा चांगले दिवस आणण्याहेतू आणि शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सदरचा निर्णय घेतल्याचे मुंडे भाऊ-बहिणींनी उघडपणे सांगितले. त्यानुसार पंकजा मुंडे यांचे कारखान्यावर अकरा सदस्य तर धनंजय मुंडे यांचे दहा सदस्य बिनविरोध निवडण्यात आले. आज वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक गोपीनाथ गडावर पार पडली. या बैठकीमध्ये एकमताने माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे वैद्यनाथ कारखान्याचे अध्यक्षपद सोपवण्याचा निर्णय झाला आणि ही निवड बिनविरोध झाली. तर दुसरीकडे उपाध्यक्ष पदावर माजी मंत्री धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदरचा निवडीचा कार्यक्रम झाल्यानंतर धनंजय मुंडे गटाचे अजय मुंडे यांनी पंकजा मुंडे, चंद्रकांत कराडसह उपस्थित संचालकांचा हृदयसत्कार केला. एवढेच नव्हे तर पंकजा मुंडे यांनीही उपस्थित सर्व संचालकांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या वेळी खा. प्रितम मुंडे, अजय मुंडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.








