Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रनवा इतिहास घडणार; देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्यावर फडकणार

नवा इतिहास घडणार; देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्यावर फडकणार

अहमदनगर: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्यावर ७४ मीटर उंचीचा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. जगातील सर्वांत उंचीचा हा ध्वज असेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणी हा ध्वज फिरवला जाईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल, असे पवार यांनी जाहीर केले. हा ध्वज तयार झाला असून त्याचे संत-महंताच्या हस्ते पूजन करण्यात आले.

जिल्ह्यातील खर्डा किंवा शिवपट्टन किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. याच किल्ल्याच्या कातळांनी एकेकाळच्या निधड्या छातीच्या रांगड्या मावळ्यांचा पराक्रम पाहिला आहे. त्यामुळे या किल्ल्याच्या आवारात शौर्य आणि एकतेचे प्रतीक म्हणून ७४ मीटरचा जगातील सर्वात मोठा भगव्या रंगाचा स्वराज्य ध्वज लावला जाणार आहे. देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणी आणि पंढरपूरला हा ध्वज फिरवला जाईल. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज खर्डा किल्ल्याच्या आवारात लावला जाईल. या ध्वजाविषयी मत व्यक्त करताना आमदार रोहित पवार म्हणाले, ‘हा भगवा रंगाचा स्वराज्य ध्वज कोणा एकाचा नसून सर्वांचा आहे. या ध्वजाच्या माध्यमातून कर्जत-जामखेड मतदारसंघाला नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. हा ध्वज जगभरातील पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे. सामर्थ्य, धैर्य, शक्ती, भक्ती, प्रगती यांचेही प्रतीक ठरेल आणि डौलाने फडकत राहील,’ असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Most Popular

error: Content is protected !!