अपात्र झालेल्या शेतकर्यांना पैसे परत देण्यासाठी गांधीले यांची टाळाटाळ
बीड (रिपोर्टर) पीएम कुसुम योजनेत अपात्र झालेल्या शेतकर्यांनी सौरपंपासाठी पैसे भरलेले आहेत. मात्र ते शेतकरी अपात्र झाल्याने पोर्टलवर अपात्रतेची नोंद करून त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी शेतकरी बीड शहरातील महाऊर्जा कार्यालयात (मेडा) खेटा मारतात मात्र येथील अधिकारी गांधले कधीच हजर नसतात, फोनही घेत नाहीत. त्यामुळे शेतकरी जाम वैतागले आहेत. याबाबत अनेकांनी जिल्हाधिकार्यांकडेही तक्रारी केल्या आहेत.
जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेतलेला आहे तर काही शेतकरी काही कारणास्तव अपात्र ठरलेले आहेत. मात्र अपात्र ठरण्यापूर्वी त्यांनी शासनाला सौरपंपासाठी पैसे भरलेले आहेत. जे शेतकरी अपात्र ठरलेले आहेत त्यांना सौरपंपही मिळालेले नाहीत आणि भरलेले पैसेही परत मिळालेले नाहीत. त्यामुळे आम्हाला सौरपंप मिळत नसेल तर पैसे परत द्या, अशी मागणी शेतकरी महाऊर्जा कार्यालयाच्या अधिकार्यांकडे करत आहेत. रितसर त्यांचे पैसे परत मिळणार आहेत, फक्त महाऊर्जा कार्यालयाने त्यांचा अपात्रतेचा अर्ज मंजूर करणे गरजेचे आहे. मात्र तेवढेही करण्यासाठी येथील अधिकारी गांधिले यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे शेतकरी जाम वैतागले आहेत. या प्रकरणी रांजणी येथील अप्पासाहेब शाहूराव रोडगे या शेतकर्याने वारंवार महाऊर्जा कार्यालयात खेटा मारल्या मात्र तरी देखील त्यांना भरलेली रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्जाद्वारे आपली रक्कम परत मिळण्याची मागणी केली आहे .








