Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाग्रामीण भागातील बाजार बंद; उलाढाल थांबली खेड्यातील छोटे-मोठे व्यापारी अडचणीत

ग्रामीण भागातील बाजार बंद; उलाढाल थांबली खेड्यातील छोटे-मोठे व्यापारी अडचणीत


दहा वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू करण्याची परवानगी दिली आता बाजारही सुरू करा
बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग सध्या आटोक्यात आलेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने रात्री दहा वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातील बाजार आजही बंद आहेत. बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातील उलाढाल थांबली आहे. ग्रामीण भागातील बाजारातून आठवड्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. इतर सर्व व्यवहार सुरू केले आता बाजारही सुरू करायला हवेत. अशी अपेक्षा छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाभरातील सर्व आठवडी बाजार बंद आहेत. आठवडी बाजार बंद असल्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील मोठी उलाढाल थांबली. बाजाराने आठवड्याला कोटयवधी रुपयांची उलाढाल होत असते. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे अर्थकारण फिरत राहत असते. आठवडी बाजारावर अनेकांचा संसार अवलंबून आहे. जेव्हापासून आठवडी बाजार बंद आहेत तेव्हापासून बाजारावर अवलंबून असलेले व्यापारी प्रचंड प्रमाणात अडचणीत सापडले. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्य सरकारने सर्व व्यवहार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले आहे त्यामुळे व्यावसायिकात उत्साह निर्माण झाला असला तरी ग्रामीण भागातील व्यावसायिकांना मात्र अजूनही चांगले दिवस आले नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील बाजार सुरू केल्यास अर्थकारणाला बळकटी येईल आणि व्यापार्‍यांनाही त्याचा फायदा होईल. यासाठी आठवडी बाजार सुरू करावेत, अशी अपेक्षा व्यापार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.

बैल बाजार बंद असल्याने शेतकरी गावोगावी जावून खरेदी करतात जनावरे
आठवडी बाजार पुर्णत: बंद असल्याने शेतकरीही मोठ्या अडचणीत सापडला. बीड जिल्ह्यामध्ये हिरापूर, नेकनूर हे दोन जनावरांचे मोठे बाजार आहेत. मात्र हे बाजार बंद असल्यामुळे शेतकर्‍यांना जनावरे विकण्यास व खरेदी करण्यास अडचण निर्माण होत आहे. ज्या शेतकर्‍यांना जनावरे खरेदी करायचे आहे अशा शेतकर्‍यांना गावोगावी जावून जनावरे खरेदी करावे लागत आहेत. या दोन बाजारातून आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

Most Popular

error: Content is protected !!