Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमकेजमध्ये दुचाकीला चिरडले; दोन तरुण ठार, एक जखमी

केजमध्ये दुचाकीला चिरडले; दोन तरुण ठार, एक जखमी


मोटारसायकलला दीडशे फुट फरफटत नेले, वाहनासह चालक फरार
केज (रिपोर्टर)- मोटारसायकलवरून घराकडे निघालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसासह दोन तरुणांच्या गाडीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर प्रशिक्षणार्थी पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास केज-बीड महामार्गावर कानडी रस्त्यावर घडला. अपघात इतका भयानक होता की, मृत्यूमुखी पडलेल्या दोघांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला तर मोटारसायकल शंभर ते दीडशे फुट फरफटत गेली. यातील जखमी प्रशिक्षणार्थी पोलिसास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक असे की, केज येथील फुलेनगर भागात राहणारे सुजित सुरेश राऊत (वय २०), सुमित संदीपान सिरसट (वय १८) व गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण घेत असलेले विजयकुमार पांडुरंग घोळवे हे तिघे मोटारसायकल (क्र. एम.एच. ४४ एम. २३०३) यावरून घराकडे जात होते. मध्यरात्री दरम्यान केज-बीड महामार्गावरील कानडी येथे त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक देत चिरडले. यात सुजित सुरेश राऊत व सुमित संदीपान सिरसट हे दोघे जागीच मृत्यू पावले. अपघात एवढा भयानक होता की, मोटारसायकल शंभर ते दीडशे फुट फरफटत नेली. त्यामुळे या दोघांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. घटनास्थळी रक्तमांसाचा चिखल पहावयास मिळाला. सदरच्या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. प्रथमदर्शींचे हृदय हेलावणार्‍या या घटनेत प्रशिक्षणार्थी पोलीस विजयकुमार घोळवे यांच्या उजव्या पायाला व डोक्याला मार लागला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन हे कळंब चौकातून पुढच्या दिशेला गेल्याचे सांगण्यात येते. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसाळ, उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रमेश सानप, बाळासाहेब अहंकारे, चालक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी घोळवे यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. मृत्यू पावलेला सुमित सिरसट हा बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी होता. तर सुजित सुरेश राऊत याचे एक वर्षापुर्वी लग्न झालेले होते.

Most Popular

error: Content is protected !!